राजे ग्रुपच्या १२ व्या वर्षातील शिवजयंती सोहळ्याने शहर दुमदुमले…टिटवाळा झाला शिवमय!

Whatsapp image 2026 02 19 at 2.08.26 pm

उत्सव हे केवळ साजरे करण्यासाठी नसतात, तर इतिहासाची जाणीव जागी ठेवत भविष्यासाठी प्रेरणा देणारे दीपस्तंभ ठरतात – राजे ग्रुपचे महेश एगडे

टिटवाळ्यात शिवगर्जना; ३९६ व्या शिवजयंतीनिमित्त शहरात अभूतपूर्व जल्लोष

पालख्या, रथयात्रा, सांस्कृतिक सोहळे आणि पोलिसांचाही उत्स्फूर्त सहभाग

टिटवाळा : अजय शेलार 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त टिटवाळा शहरात शिवतेजाची अक्षरशः दिमाखदार उधळण झाली. पहाटेपासूनच “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला. महाराष्ट्रासह देश-विदेशात उत्साहात साजऱ्या होणाऱ्या या जयंतीची झळाळी टिटवाळ्यातही ठळकपणे उमटली. गावागावांत, सोसायट्यांत आणि प्रमुख चौकांमध्ये शिवप्रतिमांचे पूजन, पुष्पहार अर्पण आणि मानवंदना देत नागरिकांनी स्वराज्यसंस्थापकाला कृतज्ञतेने मुजरा केला.


राजे ग्रुपच्या १२ व्या वर्षातील सोहळ्याने शहर दुमदुमले

टिटवाळा शहर शनिवारी अक्षरशः शिवमय झाले होते. राजे ग्रुप टिटवाळा आणि ग्रामस्थ मंडळ टिटवाळा यांच्या संयुक्त विद्यमाने महागणपती चौकात पार पडलेला मुख्य सोहळा अभूतपूर्व दिमाखात साजरा झाला. परंपरा, श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम घडवणाऱ्या या उपक्रमाने १२ वर्ष पूर्ण करताना केवळ उत्सव नव्हे, तर सामूहिक अभिमानाचा सोहळाच उभा केला. सकाळपासूनच चौकात भाविकांची गर्दी उसळली होती. मंत्रोच्चार, ढोल-ताशांचा गजर आणि शिवगर्जनेच्या निनादात धार्मिक विधींना प्रारंभ झाला आणि परिसरात भक्तीभावाचे दाट वातावरण निर्माण झाले.

या वर्षीच्या आयोजनात धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक उपक्रमांचीही प्रभावी सांगड घालण्यात आली. भोजन व मिष्ठान्न वितरणातून सर्वसमावेशकतेचा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. बालगोपाळांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व स्तरांतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उत्सवाला व्यापक स्वरूप दिले. महागणपती चौकात सजवण्यात आलेली देखणी रोषणाई, भगवे ध्वज आणि आकर्षक सजावट, मर्दानी खेळांचा थरार शिवभक्तांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. यामुळे संपूर्ण परिसर उत्सवाच्या रंगात न्हाऊन निघाला होता. गणेश मंदिर परिसराच्या प्रांगणात उसळलेला उत्साह, घोषणांचा कडकडाट आणि शिवप्रेमाची उर्मी शहराच्या अस्मितेला नवी धार देणारी ठरली. या सोहळ्याने टिटवाळ्याच्या सामाजिक ऐक्याला अधोरेखित करत परंपरेचा वारसा जपण्याची सामूहिक जबाबदारीही अधोरेखित केली. उत्सव हे केवळ साजरे करण्यासाठी नसतात, तर इतिहासाची जाणीव जागी ठेवत भविष्यासाठी प्रेरणा देणारे दीपस्तंभ ठरतात अश्या भावना यावेळी राजे ग्रुपचे महेश एगडे यांनी व्यक्त केले.     

Whatsapp image 2026 02 19 at 2.06.34 pm
टिटवाळा पश्चिमेकडील जानकी विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी पारंपरिक वेशभूषेत काढलेली पालखी मिरवणूक विशेष दखलपात्र ठरली. ढोल-ताशा आणि लेझीमच्या ठेक्यावर पुढे सरकणारी ही मिरवणूक स्वराज्याच्या पराक्रमाची जिवंत आठवण ठरली. लहानग्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि शिस्तबद्ध सहभाग उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता. रिजन्सी सर्वम शिवजयंती उत्सव मंडळाने साकारलेली रथयात्रा हा सोहळ्याचा उत्कर्षबिंदू ठरला. महाराजांची वेशभूषा धारण केलेल्या प्रतिकात्मक शिवरायांना रथात विराजमान करून पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढलेली भव्य मिरवणूक शहरभर चर्चेचा विषय ठरली.

Img 20260219 102027

ढोल-ताशांच्या गजरात आणि लेझीमच्या तालावर दुमदुमणारे टिटवाळा शिवभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले. विशेष म्हणजे, बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडत असतानाही टिटवाळा पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज गिरी, सहाय्यक पोलिस निरीक्षक सरला काळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानोबा इंद्राळे यांसह पोलिस कर्मचाऱ्यांनीही शिवरायांना अभिवादन करत आपले शिवप्रेम व्यक्त केले. कर्तव्य आणि श्रद्धा यांचा सुंदर संगम या निमित्ताने पाहायला मिळाला. टिटवाळ्यातील हा सोहळा केवळ उत्सवी जल्लोषापुरता मर्यादित राहिला नाही; तर स्वराज्याच्या मूल्यांची, राष्ट्राभिमानाची आणि एकात्मतेची पुनःप्रत्ययाची जाणीव करून देणारा ठरला. शिवरायांचे शौर्य, दूरदृष्टी आणि लोककल्याणाचा आदर्श स्मरून टिटवाळ्याने शिवतेजाला दणदणीत मानवंदना अर्पण केली.

Whatsapp image 2026 02 21 at 9.50.27 am

 रिजन्सी सर्वंम सोसायटी येथील राहीवाशी असलेल्या प्रियांशी प्रवीण सातपुते या चिमुकलीने शिवजयंती निमित्त काढण्यात आलेल्या भव्य रथयात्रा पारंपारिक वेशभूषेत आपल्या लाडक्या राजाला भगवा ध्वज हातात घेऊन मानवंदना दिली .
भगव्या ध्वजासह उभी असलेली ही चिमुकली जणू शिवतेजाचीच साक्ष देत होती.
पारंपारिक वेशभूषेत तिने आपल्या लाडक्या राजांना दिलेली मानवंदना पाहून वातावरण शिवमय झाले.
रथयात्रेच्या गजरात तिच्या डोळ्यांतील अभिमान आणि चेहऱ्यावरचा निर्धार खास लक्षवेधी ठरला.
लहान वयातही शिवभक्तीची ही ज्योत तेजाने प्रज्वलित झालेली दिसली.
छोट्याशा हातातील भगवा ध्वज, पण मनात अफाट स्वराज्याचा अभिमान !
Img 20260219 110649 (1)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *