उत्सव हे केवळ साजरे करण्यासाठी नसतात, तर इतिहासाची जाणीव जागी ठेवत भविष्यासाठी प्रेरणा देणारे दीपस्तंभ ठरतात – राजे ग्रुपचे महेश एगडे
टिटवाळ्यात शिवगर्जना; ३९६ व्या शिवजयंतीनिमित्त शहरात अभूतपूर्व जल्लोष
पालख्या, रथयात्रा, सांस्कृतिक सोहळे आणि पोलिसांचाही उत्स्फूर्त सहभाग
टिटवाळा : अजय शेलार
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त टिटवाळा शहरात शिवतेजाची अक्षरशः दिमाखदार उधळण झाली. पहाटेपासूनच “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला. महाराष्ट्रासह देश-विदेशात उत्साहात साजऱ्या होणाऱ्या या जयंतीची झळाळी टिटवाळ्यातही ठळकपणे उमटली. गावागावांत, सोसायट्यांत आणि प्रमुख चौकांमध्ये शिवप्रतिमांचे पूजन, पुष्पहार अर्पण आणि मानवंदना देत नागरिकांनी स्वराज्यसंस्थापकाला कृतज्ञतेने मुजरा केला.
राजे ग्रुपच्या १२ व्या वर्षातील सोहळ्याने शहर दुमदुमले

टिटवाळा पश्चिमेकडील जानकी विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी पारंपरिक वेशभूषेत काढलेली पालखी मिरवणूक विशेष दखलपात्र ठरली. ढोल-ताशा आणि लेझीमच्या ठेक्यावर पुढे सरकणारी ही मिरवणूक स्वराज्याच्या पराक्रमाची जिवंत आठवण ठरली. लहानग्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि शिस्तबद्ध सहभाग उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता. रिजन्सी सर्वम शिवजयंती उत्सव मंडळाने साकारलेली रथयात्रा हा सोहळ्याचा उत्कर्षबिंदू ठरला. महाराजांची वेशभूषा धारण केलेल्या प्रतिकात्मक शिवरायांना रथात विराजमान करून पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढलेली भव्य मिरवणूक शहरभर चर्चेचा विषय ठरली.

ढोल-ताशांच्या गजरात आणि लेझीमच्या तालावर दुमदुमणारे टिटवाळा शिवभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले. विशेष म्हणजे, बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडत असतानाही टिटवाळा पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज गिरी, सहाय्यक पोलिस निरीक्षक सरला काळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानोबा इंद्राळे यांसह पोलिस कर्मचाऱ्यांनीही शिवरायांना अभिवादन करत आपले शिवप्रेम व्यक्त केले. कर्तव्य आणि श्रद्धा यांचा सुंदर संगम या निमित्ताने पाहायला मिळाला. टिटवाळ्यातील हा सोहळा केवळ उत्सवी जल्लोषापुरता मर्यादित राहिला नाही; तर स्वराज्याच्या मूल्यांची, राष्ट्राभिमानाची आणि एकात्मतेची पुनःप्रत्ययाची जाणीव करून देणारा ठरला. शिवरायांचे शौर्य, दूरदृष्टी आणि लोककल्याणाचा आदर्श स्मरून टिटवाळ्याने शिवतेजाला दणदणीत मानवंदना अर्पण केली.

पारंपारिक वेशभूषेत तिने आपल्या लाडक्या राजांना दिलेली मानवंदना पाहून वातावरण शिवमय झाले.
रथयात्रेच्या गजरात तिच्या डोळ्यांतील अभिमान आणि चेहऱ्यावरचा निर्धार खास लक्षवेधी ठरला.
लहान वयातही शिवभक्तीची ही ज्योत तेजाने प्रज्वलित झालेली दिसली.
छोट्याशा हातातील भगवा ध्वज, पण मनात अफाट स्वराज्याचा अभिमान !
















टिटवाळ्यात फळविक्रेत्या सलमा यांचा सार्वजनिक गौरव; विचारांची खरी शिवजयंतीचा सामाजिक संदेश -
[…] राजे ग्रुपची शिवजयंती विशेषांकात प्रसिद्ध झालेल्या […]