उरलेल्या औषधांची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे; समाजभानाचा संदेश

“जोडीने चालूया” उपक्रमात प्रा. मंजिरी घरत यांचा इशारा; स्वउपचार टाळण्याचे आवाहन

डोंबिवली :  औषधांचा वापर करताना वैद्यकीय सल्ला घेणे अत्यावश्यक असून स्वउपचार टाळावा, अन्यथा गंभीर धोका संभवतो, असा स्पष्ट इशारा आंतरराष्ट्रीय फार्मास्युटिकल फेडरेशनच्या भारतातील दूत प्रा. मंजिरी घरत यांनी दिला. पै फ्रेंड्स लायब्ररी आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “जोडीने चालूया” या उपक्रमात त्यांनी औषधभान आणि सामाजिक जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित केले.

या कार्यक्रमात ज्येष्ठ लेखक आणि कंपनी उच्चाधिकारी माधव जोशी यांनी प्रा. मंजिरी घरत आणि त्यांचे पती डॉ. संदीप घरत यांची मुलाखत घेतली. अमेरिकेत शिक्षण पूर्ण करून भारतात परत येत व्यवस्थापन, शिक्षण आणि सेवा क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर योगदान देणाऱ्या या डोंबिवलीकर दांपत्याचा प्रेरणादायी जीवनप्रवास उलगडला.

डॉ. संदीप घरत यांनी समाजसेवेसाठी वेळ देणे आणि आपल्या शिक्षण- अनुभवाचा समाजहितासाठी उपयोग करणे किती आवश्यक आहे, यावर भर दिला. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टचे अध्यक्ष म्हणून काम करताना समाजाशी जोडलेले राहणे आणि संस्थांना सक्षम करणे हीच खरी जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा. मंजिरी घरत यांनी औषधविक्रेत्यांची समाजप्रबोधनातील भूमिका स्पष्ट करताना क्षयरोग निर्मूलन मोहिमेत दिलेल्या योगदानाची उदाहरणे दिली. तसेच वापरून उरलेली आणि मुदतबाह्य औषधे योग्य पद्धतीने नष्ट करणे किती गरजेचे आहे, यावर त्यांनी विशेष भर दिला. यासाठी समाज, स्वयंसेवी संस्था आणि प्रशासन यांचे संयुक्त प्रयत्न आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.


कार्यक्रमाची सुरुवात पुंडलिक पै यांच्या स्वागतपर भाषणाने झाली, तर ललिता छेडा यांनी सूत्रसंचालन केले. सुमारे २५० श्रोत्यांच्या उपस्थितीत रंगलेल्या या कार्यक्रमातून औषधभान आणि सामाजिक जबाबदारीचा प्रभावी संदेश देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *