टिटवाळा : टिटवाळा पूर्वेतील आर. के. नगर परिसरात दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पथदिवे व मूलभूत सुविधांच्या प्रश्नाला अखेर पूर्णविराम मिळाला असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठपुराव्यामुळे पथदिव्यांचे उद्घाटन आणि विविध विकासकामे पूर्णत्वास गेली आहेत. मनसेचे सरचिटणीस, माजी आमदार तथा कल्याण शहर अध्यक्ष प्रकाश भोईर यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.
आर. के. नगर परिसरात यापूर्वी रस्त्यांवरील अंधार, खड्डे, चिखल आणि असुविधांमुळे नागरिक त्रस्त होते. विशेषतः रात्रीच्या वेळी पथदिवे नसल्यामुळे महिला, वृद्ध आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. मात्र मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा करत हा प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवला आणि त्यावर उपाययोजना करण्यास भाग पाडले.
या पार्श्वभूमीवर केवळ पथदिवेच नव्हे, तर रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण, गटार दुरुस्ती आदी कामेही पूर्ण करण्यात आली. परिणामी परिसरातील रहिवाशांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी मोठ्या प्रमाणात कमी झाल्या असून, प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ झाला आहे.
उद्घाटन प्रसंगी प्रकाश भोईर यांनी मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे कौतुक करत, “स्थानिक पातळीवरील सातत्यपूर्ण प्रयत्न आणि जनतेच्या प्रश्नांबाबतची बांधिलकी यामुळेच हे यश मिळाले,” असे सांगितले. त्यांनी विशेषतः शाखा अध्यक्ष मिलिंद सावंत तसेच मनसे उपशाखा अध्यक्ष (वॉर्ड क्र. १०) समीर विष्णु मेस्त्री यांच्या पाठपुराव्याचे विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमाला मनसे उप जिल्हा अध्यक्ष दिनेश भोय, शाखा अध्यक्ष मिलिंद सावंत ,उपशाखा अध्यक्ष समीर मेस्त्री, सचिन किलजे, अमेय पाटकर, गट अध्यक्ष सुहास केळुस्कर, राकेश मोरे, विलास पावसकर, तसेच कार्यकर्ते विजय कांबळी, सूर्यकांत किलजे, विनोद जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, ‘मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त केलेल्या पाठपुराव्याला यश’ असे फलक लावत स्थानिकांनी या कामांचे स्वागत केले असून, “आता परिसरात अंधार नाही, रस्ते सुधारले आहेत आणि प्रवास सुखकर झाला आहे,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. एकंदरीतच, आर. के. नगरमध्ये झालेल्या या विकासकामांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, मनसेच्या स्थानिक संघटनेची कार्यक्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.














Leave a Reply