घरपोच सेवा मिळत नाही, पण काही व्यावसायिकांना प्राधान्य? — सामाजिक कार्यकर्ते विजय (भाऊ) देशेकर यांनी मुद्दा उपस्थित करत पारदर्शकतेची मागणी
टिटवाळा, वार्ताहर : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या घंटागाड्या नेमक्या करदात्या सर्वसामान्य नागरिकांसाठी आहेत की काही निवडक व्यावसायिकांसाठी, असा गंभीर प्रश्न आता उभा राहू लागला आहे. शहरातील अनेक भागांत नागरिकांना घरापर्यंत कचरा संकलन सेवा नियमितपणे मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत असताना, काही विशिष्ट व्यावसायिकांकडील कचरा मात्र प्राधान्याने उचलला जात असल्याचे चित्र समोर येत आहे. टिटवाळा गणेश मंदिर परिसरात मुख्य रस्त्यावर छायाचित्रात दिसत असलेल्या घंटागाडीत केवळ नारळ पाणी विक्रेत्याचा कचरा ओसंडून वाहत आहे .
सामाजिक कार्यकर्ते विजय (भाऊ) देशेकर यांनी हा मुद्दा पुढे आणत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर थेट सवाल उपस्थित केला आहे. “ही सेवा सर्वांसाठी समान आहे का, की काही ठिकाणी वेगळी पद्धत राबवली जाते?” असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित करत नागरिकांच्या मनातील संभ्रमाला आवाज दिला आहे.
नागरिकांचा अनुभव वेगळाच सांगतो. अनेक ठिकाणी घंटागाड्या वेळेवर येत नाहीत, आल्यावर कचरा घेण्यात टाळाटाळ केली जाते किंवा विविध कारणे देत सेवा नाकारली जाते. परिणामी, नागरिकांना कचरा साठवून ठेवण्याची किंवा इतर पर्याय शोधण्याची वेळ येते. दुसरीकडे, काही ठिकाणी व्यावसायिक आस्थापनांचा कचरा नियमित आणि प्राधान्याने उचलला जात असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत.यामुळेच शहरात एकच प्रश्न चर्चेत आहे — सार्वजनिक सेवा खरंच सर्वांसाठी समान आहे का? की या व्यवस्थेत कुठेतरी दुजाभाव केला जातो आहे?
या पार्श्वभूमीवर विजय (भाऊ) देशेकर यांनी प्रशासनाकडे स्पष्टता आणि पारदर्शकतेची ठाम मागणी केली आहे. जर विशिष्ट प्रकारच्या कचऱ्यासाठी स्वतंत्र सेवा किंवा वेगळी यंत्रणा अस्तित्वात असेल, तर त्याबाबत अधिकृत सूचना, नियम आणि स्पष्ट माहिती घंटागाड्यांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित केली जावी, जेणेकरून नागरिकांमध्ये संभ्रम राहणार नाही. शहरातील वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करणे गरजेचे ठरत आहे. कारण, करदात्या नागरिकांना समान आणि पारदर्शक सेवा देणे ही केवळ जबाबदारी नसून प्रशासनाची मूलभूत कर्तव्य आहे.














Leave a Reply