टिटवाळा : स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त पालखी सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न; 300-350 भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग

टिटवाळा, वार्ताहर : टिटवाळा परिसरात स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य पालखी सोहळा रविवार दि. ५ एप्रिल रोजी अत्यंत भक्तीभाव, उत्साह आणि आध्यात्मिक वातावरणात संपन्न झाला. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर (दिंडोरी प्रणित) केंद्र टिटवाळा विभागाच्या वतीने आयोजित या सोहळ्याने संपूर्ण परिसर स्वामी नामाच्या गजराने दुमदुमून गेला.

स्वामी नामाचा गजर करत पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. मारुती मंदिर, पाटील नगर, साईबाबा कॉलनी, ज्ञानेश्वर महाराज मंदिर (पंचवटी), मल्हार चौक, गावदेवी मंदिर आणि टिटवाळा पोलीस स्टेशन परिसरातून मार्गक्रमण करत ही पालखी भक्तांच्या जयघोषात पुढे सरकत राहिली. भगव्या पताकांचा डौल, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि ‘अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय’ या घोषणांनी वातावरण पूर्णतः भक्तिमय झाले होते.

या सोहळ्यात सुमारे 300 ते 350 सेवेकरी आणि भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. महिला, पुरुष, युवक आणि लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत सोहळ्याला विशेष रंगत आणली. अनेक भजन मंडळांनीही सहभाग घेत भक्तिगीतांच्या माध्यमातून वातावरण अधिकच प्रसन्न केले. काही ठिकाणी भाविकांनी पालखीचे स्वागत करून आरती व पुष्पवृष्टी करत श्रद्धा व्यक्त केली.

कार्यक्रमादरम्यान स्वामी समर्थांच्या शिकवणीचे स्मरण, नामस्मरणाचे महत्त्व आणि समाजात आध्यात्मिक एकात्मता निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. केवळ उत्सव न राहता, हा सोहळा श्रद्धा, समर्पण आणि कृतज्ञतेचा भाव जागवणारा ठरला.

टिटवाळा परिसरात या सोहळ्यामुळे आध्यात्मिक उर्जा निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. भक्तांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्ट दिसत होता. शांत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा पालखी सोहळा यशस्वीरीत्या पार पडला असून, टिटवाळ्याच्या धार्मिक परंपरेत आणखी एक प्रेरणादायी अध्याय जोडला गेला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *