मुरबाड, वार्ताहर : ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात माळशेज घाटाच्या पायथ्याशी वसलेले वाघवाडी हे आदिवासी बहुल खेडेगाव आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे चित्र समोर आले आहे. एकीकडे निसर्गसौंदर्याने नटलेला आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला माळशेज घाट परिसर, तर दुसरीकडे त्याच पायथ्याशी राहणाऱ्या आदिवासी नागरिकांचे दैनंदिन हाल – अशी विरोधाभासी परिस्थिती येथे पाहायला मिळत आहे.
सावरणे गावाजवळील कोंभाळपाडा ते वाघवाडी या दरम्यानचा मुख्य रस्ता सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून उघडे दगड बाहेर आल्याने वाहन चालवणे अत्यंत धोकादायक बनले आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग अक्षरशः अपघाताचे आमंत्रण ठरत आहे.
स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची योग्य दुरुस्ती करण्यात आलेली नाही. परिणामी विद्यार्थी, शेतकरी, तसेच रोजंदारी करणारे नागरिक यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो, तर शेतमाल वाहतूक करताना शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.
दरम्यान, पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असताना या रस्त्याची स्थिती अधिकच चिंताजनक बनली आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे रस्ता पूर्णतः धोकादायक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होऊन गावाचा संपर्क तुटण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधित प्रशासनाकडे तक्रारी करूनही केवळ आश्वासनांवरच समाधान मानावे लागत असल्याची खंत व्यक्त केली आहे. “अधिकाऱ्यांकडून फक्त पाहणी आणि आश्वासने दिली जातात, मात्र प्रत्यक्षात कोणतीही कामे होत नाहीत,” अशी नाराजी स्थानिकांनी व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर वाघवाडी आणि परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देत कोंभाळपाडा-वाघवाडी रस्त्याची दुरुस्ती त्वरित करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.














Leave a Reply