चंद्रकांत देसले /शहापूर
शहापूर तालुक्यातील गुंडे, वाळशेत, डेहणे, पाचघर, कांबे, आजोबा पर्वतरांग, चिंचवाडी व खोखरीचीवाडी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यांनी अक्षरशः थैमान घातले आहे. काल रात्री वालशेत गावाजवळील स्मशानभूमी परिसरात बिबट्या आढळून आला. त्यानंतर रात्री अंदाजे १:०० वाजण्याच्या सुमारास नागनाथ वेखंडे यांच्या घराजवळील बेड्यात घुसून म्हशीच्या पारड्यावर हल्ला करत त्याला ठार केले. वर्षभरात तब्बल १० ते १५ वेळा पाळीव जनावरांवर हल्ल्यांच्या घटना घडल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे नागनाथ वेखंडे या शेतकऱ्यांच्या बाबतीतच वर्षभरात तीन वेळा बिबट्याने हल्ला करून जनावरे ठार केली आहेत. वनविभागाकडून पंचनामे करून नुकसान भरपाई दिली जात असली, तरी या सततच्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. गावकऱ्यांचा आरोप आहे की, वनविभाग केवळ कागदोपत्री कारवाई करत असून बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात अपयश येत आहे. “नुकसान भरपाई नको, पण आमची जनावरे व जीव सुरक्षित राहावेत,” अशी तीव्र भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, वनविभागाने संबंधित भागात ट्रॅप कॅमेरे लावले असून हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. तसेच हल्ल्यांच्या घटनांचे पंचनामेही करण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी ठोस पावले उचलण्यात यावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे “शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळ सुरू असताना वनविभाग मात्र निवांत बसला आहे, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. एकाच परिसरात वारंवार बिबट्याचे हल्ले होत आहेत, तरीही कायमस्वरूपी उपाययोजना का होत नाहीत? हा प्रश्न आज प्रत्येक गावकरी विचारत आहे.













Leave a Reply