४५ अंशांच्या उकाड्यात मांडा-टिटवाळा अंधारात; वारंवार वीज खंडितीमुळे नागरिक संतप्त, महावितरणची यंत्रणेवर ताण

टिटवाळा : टिटवाळा पूर्व-पश्चिम, मांडा, बनेली तसेच गावदेवी मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार होत असलेल्या वीज खंडितीमुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. प्रचंड उष्णतेच्या पार्श्वभूमीवर दिवसातून अनेकदा वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे. काही भागांत दोन ते तीन वेळा लाईट जाण्याच्या घटना घडत असून अनेक ठिकाणी तीन ते पाच तास नागरिकांना अंधार आणि उकाड्यात दिवस काढावा लागत आहे.

राज्यात वाढलेल्या तापमानामुळे विजेची मागणी विक्रमी पातळीवर पोहोचली असून त्याचा मोठा ताण टिटवाळा परिसरातील वीज यंत्रणांवर पडत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. टिटवाळ्याला वीजपुरवठा करणारी कांबा आणि गोवेली येथील सबस्टेशन्स दूर अंतरावर असल्याने तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. वाढती लोकसंख्या, झपाट्याने वाढणारी गृहसंकुले आणि सतत वाढणारा विजेचा वापर यामुळे स्थानिक शाखेवरील भार प्रचंड वाढल्याचे स्पष्ट करण्यात आले.

महावितरणच्या नियमानुसार एका शाखेकडे साधारण २० हजार ग्राहकांचा भार असणे अपेक्षित असतो. मात्र टिटवाळा शाखेकडे तब्बल ६७ ते ६८ हजार ग्राहक असल्याने संपूर्ण यंत्रणा ओव्हरलोड झाली आहे. परिणामी वारंवार तांत्रिक बिघाड, ट्रिपिंग आणि वीजपुरवठा विस्कळीत होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यातच वादळी वारे, अवेळी पाऊस, झाडांच्या फांद्या वीजवाहिन्यांवर कोसळणे आणि उपकरणांमधील तांत्रिक दोष यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनत असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे.

महावितरणचे अधिकारी तुकाराम घोडविंदे यांनी सांगितले की, अनेक ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने नियोजित देखभाल आणि दुरुस्ती कामे करावी लागत आहेत. मुख्य वीजवाहिन्यांलगतच्या झाडांच्या फांद्यांची छाटणी, खराब कंडक्टर बदलणे आणि तांत्रिक दुरुस्ती ही अखंड वीजपुरवठ्यासाठी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे परिस्थिती अधिक बिकट होत असल्याचेही समोर आले आहे. इतक्या मोठ्या ग्राहकसंख्येसाठी किमान २० कर्मचारी आणि चार अभियंते आवश्यक असताना प्रत्यक्षात केवळ चार कर्मचारी आणि एक अभियंता संपूर्ण परिसराचा भार सांभाळत असल्याची माहिती घोडविंदे यांनी दिली. मर्यादित मनुष्यबळात कर्मचारी दिवस-रात्र काम करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी लाईनमन आणि कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले असून कठीण परिस्थितीतही कर्मचारी तत्परतेने सेवा देत असल्याचे सांगितले. मात्र वरिष्ठ स्तरावरील नियोजन आणि पायाभूत सुविधांच्या कमतरतेवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. छोट्या तांत्रिक बिघाडासाठीही दोन ते तीन तास वीजपुरवठा बंद राहत असेल तर यंत्रणेत मोठ्या सुधारणा करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. महावितरण कार्यालयाशी संपर्क साधताना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. “थोड्याच वेळात वीज येईल” असे उत्तर दिले जाते, मात्र नेमका बिघाड कुठे झाला आहे याबाबत स्पष्ट माहिती मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. अनेक वेळा कार्यालयाचे फोन सतत एंगेज येणे किंवा संपर्कच न होणे यामुळे नागरिकांचा संताप आणखी वाढत आहे.

उष्णतेचा पारा ४५ अंशांच्या आसपास पोहोचल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांचे हाल होत आहेत. घरात उकाडा असह्य झाल्याने अनेकांना घराबाहेर बसून वेळ काढावा लागत आहे. इन्व्हर्टर किंवा पर्यायी सुविधा नसलेल्या कुटुंबांची अवस्था अधिक गंभीर झाली आहे. वारंवार होणाऱ्या वीज खंडितीचा मोठा फटका व्यापारी वर्गालाही बसत आहे. डेअरी व्यवसायिक, दूध विक्रेते आणि छोटे दुकानदार यांचे दूध, दही तसेच थंड पदार्थ खराब होऊन आर्थिक नुकसान होत आहे. रोजचे भाडे, कर्मचारी खर्च आणि इतर जबाबदाऱ्या कायम असताना सततच्या नुकसानीमुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, टिटवाळा, मांडा आणि मुख्य रस्त्यालगतच्या भागांत हातगाड्या व व्यावसायिक स्टॉल्सवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत वीज वापर होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या व्यावसायिकांकडे अधिकृत वीजमीटर आहेत का, तसेच महावितरणची परवानगी घेण्यात आली आहे का, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

यासंदर्भात घोडविंदे यांनी सांगितले की, वीजचोरी आणि अनधिकृत जोडण्यांविरोधात विशेष मोहीम सुरू असून आतापर्यंत ४०० हून अधिक एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. बेकायदेशीर वीज वापराविरोधातील कारवाई आणखी कठोर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, “सामान्य नागरिकांचे वीज बिल थकल्यास तत्काळ कारवाई केली जाते, मग वारंवार होणाऱ्या वीज खंडितीवर तातडीच्या उपाययोजना का होत नाहीत?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. टिटवाळा परिसरातील वाढत्या वीज समस्येकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जनताहित फाउंडेशनचे अध्यक्ष रितेश कांबळे यांनी नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या वतीने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *