घरपोच शुल्क घेऊनही सिलेंडरसाठी ग्राहकांना गोदामात हेलपाटे
मनसेचा श्रद्धा गॅस एजन्सीवर धडक ; आंदोलनाचा इशारा
टिटवाळा : कल्याण डोंबिवली परिसरातील घरगुती गॅस ग्राहकांना होत असलेल्या विविध समस्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत श्रद्धा गॅस एजन्सी येथे जोरदार निवेदन दिले. घरगुती गॅस सिलेंडर वितरणामध्ये होत असलेला प्रचंड विलंब, घरपोच सेवा नाकारणे, घरपोच शुल्क आकारूनही ग्राहकांना स्वतः गोदामातून सिलेंडर आणण्यास भाग पाडणे, अधिकृत पावती न देणे तसेच ग्राहकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा गंभीर आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. मनसेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शासन आणि तेल कंपन्यांकडून गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याचे वारंवार सांगितले जात असताना प्रत्यक्षात ग्राहकांना सिलेंडर मिळण्यासाठी तब्बल वीस ते बावीस दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. एवढ्यावरच न थांबता सिलेंडर वितरणानंतर पुन्हा तीस दिवस पूर्ण झाल्याशिवाय पुढील बुकिंग करता येणार नसल्याचे ग्राहकांना सांगितले जात असल्याने सामान्य कुटुंबांना वर्षभरात मिळणारे हक्काचे बारा सिलेंडर मिळणेच कठीण बनले आहे. त्यामुळे गृहिणींसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घरपोच वितरणासाठी ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असतानाही अनेकांना प्रत्यक्षात घरपोच सेवा दिली जात नसल्याचा आरोपही मनसेने केला आहे. अनेक ग्राहकांना सिलेंडर घेण्यासाठी थेट गोदामात जावे लागत असून, यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि कामगार वर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे ग्राहकांकडून संकेत क्रमांक घेतल्यानंतरही अधिकृत पावती दिली जात नसल्याबाबत मनसेने गंभीर आक्षेप नोंदवत यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. ग्राहक संरक्षण अधिनियम, अत्यावश्यक वस्तू अधिनियम तसेच तेल कंपन्यांच्या ग्राहक सेवा नियमावलीनुसार ग्राहकांना वेळेत व घरपोच सेवा देणे बंधनकारक असल्याचे मनसेने स्पष्ट केले. मात्र प्रत्यक्षात ग्राहकांची होत असलेली पिळवणूक आणि एजन्सींचा मनमानी कारभार सहन केला जाणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
हे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष उल्हास दादा भोईर तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष दिनेश भोय यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. यावेळी धनंजय पाटील (उपविभाग अध्यक्ष), जयेश खंदारे (विधी व न्याय विभाग), ॲड. अविनाश शिळकंदे (उपाध्यक्ष – महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार सेना, कल्याण डोंबिवली), दिलीप राठोड (विशेष कार्यकारी अधिकारी), मिलिंद ठाकरे, गिरीश यशवंतराव, समीर मेस्त्री तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्राहकांच्या प्रश्नांवर तात्काळ तोडगा काढला नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, असा स्पष्ट इशारा यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.













Leave a Reply