टिटवाळाकरांच्या माणुसकीचा पुन्हा प्रत्यय!

घरकाम करणाऱ्या महिलेचे हरवलेले महिन्याभराचे पगाराचे पैसे नागरिकांनी जमा करून दिले; श्री सिद्धिविनायक अन्नछत्र मंडळाकडूनही अन्नधान्याची मदत

टिटवाळा : अजय शेलार 

आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी होत चाललेल्या जगात अजूनही माणुसकी जिवंत असल्याचा सुंदर अनुभव टिटवाळ्यात पाहायला मिळाला. समाजिक आवाहानाला प्रतिसाद देण्यात टिटवाळाकर नेहमीच पुढे असतात हे आज पुन्हा एकदा पाह्यला मिळाले. घरकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका गरजू महिलेचे महिनाभराच्या कष्टाचे पगाराचे पैसे हरवल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेमुळे संबंधित महिला पूर्णपणे खचून गेली होती. मात्र टिटवाळ्यातील संवेदनशील नागरिकांनी पुढाकार घेत तिच्या मदतीसाठी अक्षरशः माणुसकीची साखळी उभी केली. रिजन्सी सर्वंम येथे राहणाऱ्या सत्यम सिंग आणि त्यांच्या पत्नी यांनी या महिलेची असहाय्यता लक्षात घेत तिला मदत करण्यासाठी सोशल मिडीयावर हरवलेले आवाहन केले होते त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद टिटवाळाकरांनी दिला आहे .

सदर महिलेची आर्थिक अडचण आणि हरवलेल्या पैशांची माहिती टिटवाळ्यातील एका सोशल मीडिया ग्रुपवर शेअर करण्यात आली. ही माहिती समोर येताच अनेक नागरिकांनी आपल्या परीने मदतीचा हात पुढे केला. कुणी शंभर रुपये, कुणी पाचशे तर कुणी आपल्या क्षमतेनुसार आर्थिक मदत केली. नागरिकांच्या या छोट्या-छोट्या सहकार्यामुळे अखेर त्या महिलेची हरवलेली संपूर्ण रक्कम जमा करण्यात यश आले.

या संपूर्ण उपक्रमात श्री सिद्धिविनायक अन्नछत्र मंडळाने देखील महत्त्वाची भूमिका बजावली. “जर पूर्ण रक्कम जमा झाली नाही तर मंडळाच्या माध्यमातून निश्चित मदत करू,” अशी भूमिका मंडळाने सुरुवातीपासून घेतली होती. मात्र टिटवाळाकरांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे त्या महिलेपर्यंत केवळ आर्थिक मदतच नव्हे तर अन्नधान्याची मदत देखील पोहोचवण्यात आली.

याबाबत माहिती देताना श्री सिद्धिविनायक अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष विजय भाऊ देशेकर यांनी या महिलेला धान्य देत मदतीचा हात पुढे केला .त्यांनी सांगितले की, “समाजात अजूनही संवेदनशील आणि मदतीसाठी धावून येणारी माणसं आहेत, हे या घटनेतून पुन्हा एकदा दिसून आले. गरजवंत व्यक्तीला वेळेवर दिलेली छोटीशी मदत देखील त्यांच्यासाठी मोठा आधार ठरते. पैसा पुन्हा कमावता येतो, पण दुवा आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी मोठं मन लागतं.”

तसेच त्यांनी सर्व मदत करणाऱ्या नागरिकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करत, “हीच वेळ आहे पुण्य साठवण्याची. गरिबाला, गरजवंताला किंवा अडचणीत असलेल्या व्यक्तीला केलेली मदत आयुष्यभर आपल्या पाठीशी उभी राहते,” असे भावनिक आवाहनही केले.

श्री सिद्धिविनायक अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून यापुढेही गोरगरीब, गरजू आणि अडचणीत असलेल्या लोकांसाठी सातत्याने समाजोपयोगी कार्य करण्याची शक्ती लाभो, अशी प्रार्थना त्यांनी श्री सिद्धिविनायक गणरायाच्या चरणी व्यक्त केली. टिटवाळ्यात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात माणुसकीचा सुंदर संदेश पसरला असून नागरिकांकडून या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

तर या निमित्ताने. श्री सिद्धिविनायक अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून आता दररोज अन्नदान सेवा सुरू करण्यात आली असून गरजू, भुकेल्या आणि अडचणीत असलेल्या लोकांना नियमित अन्न उपलब्ध करून देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. “कोणीही उपाशी राहू नये, हा आमचा प्रयत्न आहे,” असल्याचे देशेकर यांनी सांगितले. तसेच समाजातील दानशूर व्यक्तींनी या अन्नदान सेवेत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. “आपल्या घरातील एका दिवसाचा आनंद जर एखाद्या गरिबाच्या ताटात अन्न देऊन साजरा केला, तर त्यातून मिळणारे समाधान अमूल्य असते. वाढदिवस, स्मृतिदिन किंवा इतर शुभ प्रसंगी नागरिकांनी अन्नदानासाठी पुढे यावे,” असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *