जनतेचे प्रेम, कार्यकर्त्यांची साथ हीच खरी संपत्ती – माजी आमदार नरेंद्र पवार
कल्याण : भाजप भटके विमुक्त मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा कल्याण पश्चिमचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघातील कल्याण पश्चिम, भिवंडी, शहापूर आणि मुरबाड आदी विधानसभा मतदारसंघांमध्ये तब्बल १० हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला आगळ्यावेगळ्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
नरेंद्र पवार यांचा वाढदिवस दरवर्षी कार्यकर्ते, नागरिक तसेच त्यांच्या समर्थकांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, यंदा पक्षाने त्यांच्यावर सोपवलेल्या महत्त्वाच्या संघटनात्मक जबाबदारीमुळे ते राजस्थानमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष भेटीगाठी घेता येत नसल्याने कार्यकर्त्यांनी वृक्षलागवडीच्या माध्यमातून त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. मुरबाड विधानसभा मतदारसंघात आमदार किसन कथोरे आणि भाजप पदाधिकारी, भिवंडी विधानसभेत आमदार महेश चौगुले आणि शहापूरमध्ये अशोक इरनक आणि भाजप पदाधिकारी यांच्या, आणि भाजप पदाधिकारी यांच्या तर कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात नरेंद्र पवार फाउंडेशन आणि भाजप पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा वृक्षलागवडीचा उपक्रम राबविण्यात आला.
सध्या राजस्थानमध्ये पार पाडताहेत महत्त्वाची पक्षीय जबाबदारी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षश्रेष्ठींनी नरेंद्र पवार यांच्यावर राजस्थानमधील पाली नगरपरिषद निवडणुकीची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्यानुसार पवार सध्या राजस्थानमध्ये पक्षाच्या संघटनात्मक कामासाठी कार्यरत आहेत. यापूर्वीही पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जबाबदारी सोपवली होती. केरळमध्ये त्यांनी प्रभावीपणे संघटनात्मक काम करत पक्षाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे आता राजस्थानमध्येही त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदारीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
‘जनतेचे प्रेम, कार्यकर्त्यांची साथ हीच खरी संपत्ती – माजी आमदार नरेंद्र पवार
वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल नरेंद्र पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली. “जनतेचे प्रेम, कार्यकर्त्यांची साथ, बहिणींचा स्नेह आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद हीच माझी खरी संपत्ती आहे,”अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, दरवर्षी वाढदिवसानिमित्त सर्वांना भेटण्याचा, त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्याचा तसेच रक्षाबंधनानिमित्त बहिणींच्या प्रेमाने आणि आपुलकीने साजरा होणारा स्नेहसोहळा अनुभवण्याचा आनंद मिळतो. मात्र, यावर्षी पक्षाने राजस्थानमधील पाली नगरपरिषद निवडणुकीची महत्त्वाची जबाबदारी सोपविल्याने आपण राजस्थानमध्ये कार्यरत असणार आहोत. त्यामुळे वाढदिवसानिमित्त सर्वांच्या भेटीगाठी घेता येणार नाहीत, तसेच रक्षाबंधनाच्या निमित्ताने घरी येऊन प्रेमाने राखी बांधणाऱ्या बहिणींनाही भेटता येणार नाही, याची मनापासून खंत असल्याचे त्यांनी सांगितले.
“आपण सर्वांनी आजवर माझ्यावर केलेले प्रेम, कार्यकर्त्यांनी दिलेली साथ, बहिणींनी दिलेला स्नेह आणि ज्येष्ठांनी दिलेले आशीर्वाद हेच माझ्यासाठी खऱ्या अर्थाने अमूल्य आहेत. मी प्रत्यक्ष उपस्थित नसलो, तरी आपले प्रेम, स्नेह, विश्वास आणि आशीर्वाद माझ्यासोबत कायम राहतील, हीच माझी अपेक्षा आहे,” असे नरेंद्र पवार यांनी नमूद केले.
दरम्यान, वाढदिवसानिमित्त करण्यात आलेल्या १० हजार वृक्षलागवडीच्या उपक्रमामुळे राजकीय शुभेच्छांसोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला आहे. भिवंडी लोकसभ मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याने हा उपक्रम व्यापक स्वरूपात राबविण्यात आला.













Leave a Reply