दुचाकी चोरीचा छडा; नेरळ पोलिसांची कारवाई

दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांसह आरोपी ताब्यात; दोन चोरीच्या दुचाकी उघडकीस

कर्जत,प्रतिनिधी, नितीन पारधी

डिक्सळ-नेरळ येथील रोहित ढाब्यासमोरून चोरीला गेलेल्या टीव्हीएस एन्टॉर्क-१२५ स्कुटी चोरीच्या गुन्ह्याचा नेरळ पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली आहे. तपासादरम्यान आणखी एका दुचाकी चोरीचा गुन्हाही उघडकीस आला आहे.

दिनांक १० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ९ वाजल्यापासून २१ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंतच्या कालावधीत डिक्सळ-नेरळ येथील रोहित ढाब्यासमोर रस्त्याच्या बाजूला उभी केलेली टीव्हीएस एन्टॉर्क-१२५ स्कुटी क्रमांक एमएच ०५ एफटी ०८७७, किंमत अंदाजे ४० हजार रुपये, अज्ञात व्यक्तीने चोरून नेली होती. याप्रकरणी २१ सप्टेंबर रोजी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याच्या तपासादरम्यान गोपनीय बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी इलिया फ्रान्सीस मिरांडा (वय १८, रा. गावदेवी बुवापाडा, अंबरनाथ, जि. ठाणे) याचा शोध घेतला. आरोपी वारंवार वास्तव्याचे ठिकाण बदलत असल्याने गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला बुवापाडा, अंबरनाथ येथून ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान त्याने दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांसह मिळून नेरळ पोलीस ठाणे हद्दीतून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर आरोपी क्रमांक १ यास अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याची पोलीस कोठडी घेण्यात आली. तसेच आरोपी क्रमांक २ व ३ हे विधीसंघर्षग्रस्त बालक असल्याने त्यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी करून नियमानुसार कार्यवाही करण्यात आली.

तपासात आणखी एक चोरी उघड

आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्जत पोलीस ठाण्यात दाखल असलेला आणखी एक दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.

– नेरळ पोलीस ठाणे गुन्हा क्र. २११/२०२६ — बीएनएस कलम ३०३(२), टीव्हीएस एन्टॉर्क-१२५, क्रमांक एमएच ०५ एफटी ०८७७, किंमत अंदाजे ४०,००० रुपये.
– कर्जत पोलीस ठाणे गुन्हा क्र. ३९५/२०२६ — बीएनएस कलम ३०३(२), डिओ स्कुटर क्रमांक एमएच ४६ एए २३३१, किंमत अंदाजे २५,००० रुपये.

ही कारवाई रायगडच्या पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड आणि नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाई पथकात पोलीस उपनिरीक्षक सुशांत वरक, पोलीस हवालदार सचीन वाघमारे, पोलीस अंमलदार राजेभाऊ केकान, आशु बेंद्रे आणि विनोद वांगणेकर यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *