रामनवमी निमित्त टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा पहिलाच उपक्रम यशस्वी
डोंबिवली : रामनवमीच्या पावन औचित्याने टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या श्री रामरक्षा पठण स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवार, २२ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत टिळकनगर विद्या मंदिर येथे हा धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम उत्साहात पार पडला.
या स्पर्धेत डोंबिवली परिसरातील ४० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. लहानग्यांपासून प्रौढांपर्यंत सर्वच वयोगटातील सहभागींच्या रामरक्षा पठणाने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. मंडळाचे हितचिंतक व समर्थभक्त संतोष बुचके, पौरोहित्य करणारे अमोल आठल्ये आणि प्रसाद नाखरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
स्पर्धा वय वर्षे ५ ते १०, ११ ते १८ आणि खुला गट अशा तीन गटांमध्ये पार पडली. प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याशिवाय पहिला आणि तिसरा गटात विशेष पारितोषिक देण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व स्पर्धक, पालक, परीक्षक आणि मंडळाचे कार्यकर्ते यांनी एकत्रितपणे रामरक्षा पठण करून कार्यक्रमाची सांगता केली. या उपक्रमाच्या यशाबद्दल प्रकल्प प्रमुख प्रसाद रिसबूड यांनी समाधान व्यक्त करत सर्व सहभागींचे आभार मानले. पुढील वर्षी ही स्पर्धा अधिक मोठ्या प्रमाणात आयोजित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
पहिला गट (५ ते १० वर्षे)
प्रथम – क्रियांश विशाल लोहार
द्वितीय – वृंदा कल्पेश कडू
तृतीय – युगंधर पुष्कराज बाकरे
विशेष पारितोषिक – अनन्या भट्टाचार्जी
द्वितीय गट (११ ते १८ वर्षे)
प्रथम – अभिनव पराग जोशी
द्वितीय – अक्षय धनंजय गद्रे
तृतीय – विदिशा मंगेश रश्मी कुलकर्णी
तृतीय गट (खुला गट)
प्रथम – तन्मयी प्रफुल्ल पाठक
द्वितीय – चैतन्य पाठक
तृतीय – तेजश्री श्रीराम सहस्रबुद्धे
विशेष पारितोषिक – पुष्पलता रिसबूड
टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या या पहिल्याच उपक्रमाने धार्मिकतेसोबतच संस्कारांची जोड देत समाजात सकारात्मक संदेश दिला असून, भविष्यात अशा उपक्रमांची व्याप्ती वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.















Leave a Reply