पुजारी निघाला हुशार… आणि दागिने घेऊन पसार

लग्नाच्या आमिषाखाली दागिन्यांची फसवणूक; पुजारीविरुद्ध गुन्हा दाखल
विश्वास संपादन करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास; पोलिसांकडून तपास वेगात

डोंबिवली : लग्नकार्याचा दोष उतरवण्याच्या नावाखाली आमिष दाखवत एका पुजाऱ्याने सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली परिसरात उघडकीस आली आहे. १७ मार्च २०२६ रोजी उशिरा रात्री ही घटना घडली असून या प्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी आरोपी पुजारी दीपक देसाई (वय अंदाजे ५५ ते ६० वर्षे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार सुलचंद नाथा भाग्यवंत (वय ६६, रा. डोंबिवली पश्चिम) यांच्या मुलीच्या लग्नासंदर्भात विधी करण्याच्या बहाण्याने आरोपीने संपर्क साधला. लग्नकार्याचा दोष उतरवण्यासाठी विशेष पूजाविधी करावा लागेल, असे सांगून त्याने तक्रारदारांचा विश्वास संपादन केला.

१७ मार्च रोजी रात्री सुमारे ११.३० ते पहाटे १ वाजेच्या दरम्यान आरोपीने विधीच्या निमित्ताने सोन्याचे ब्रेसलेट व चांदीचे दागिने मागितले. तक्रारदारांनी विश्वासाने दागिने दिल्यानंतर आरोपीने ते लाल रंगाच्या रुमालात घेतले. त्यानंतर हातचलाखीने त्याच रंगाचा दुसरा रुमाल बदलून मूळ दागिने घेऊन तो तेथून पसार झाला.

काही वेळानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदारांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी लाखो रुपयांच्या ऐवजाची फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी भा.न्या.सं. कलम ३०५ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा माग काढण्याचे काम सुरू असून आरोपी फरार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विष्णुनगर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिनकर करत आहेत.

दरम्यान, अशा प्रकारे धार्मिक विधी, लग्न किंवा दोष निवारणाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळ्यांपासून नागरिकांनी सावध राहावे, अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नये आणि मौल्यवान वस्तू देताना आवश्यक पडताळणी करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *