कल्याण :रोशन उबाळे
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची सर्वसाधारण महासभा सोमवारी (१६ मार्च २०२६) दुपारी १२.३० वाजता महापालिका प्रशासन भवन, कल्याण पश्चिम येथे पार पडली. या महासभेत स्थायी, शिक्षण, महिला व बालकल्याण, दिव्यांग कल्याण, नागरी दलित वस्ती सुधारणा तसेच झोपडपट्टी पुनर्वसन समित्यांच्या सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. सर्व पक्षांच्या संख्याबळानुसार गटनेत्यांनी सादर केलेल्या प्रस्तावांवरून या नियुक्त्या निश्चित करण्यात आल्या.
महासभेदरम्यान कर, पाणीपुरवठा, नाले आणि गटारे यांसारख्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा रंगली. विशेषतः शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणीप्रश्न अत्यंत ज्वलंत बनल्याने, या विषयावर स्वतंत्र महासभा बोलवावी, अशी ठाम मागणी अनेक नगरसेवक व नगरसेविकांनी महापौर अॅड. हर्षाली चौधरी यांच्याकडे केली. यावर महापौरांनी प्रशासनाला पाणीप्रश्नावर स्वतंत्र महासभा आयोजित करण्याचे निर्देश दिले.
महासभेच्या सुरुवातीला विरोधी पक्षनेते उमेश बोरगावकर यांच्या वडिलांच्या निधनाबद्दल सर्व सदस्यांनी उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मतदारसंघात केलेल्या विकासकामांबद्दल आणि उपलब्ध करून दिलेल्या निधीबद्दल त्यांचा सत्कार करण्याचा ठराव महासभेत मांडण्यात आला. हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड करण्यात आली. यामध्ये भाजपचे दीपेश म्हात्रे, मंदार हळबे, मनीषा गायकवाड, दया गायकवाड, उपेक्षा भोईर, मुकुंद पेडणेकर, नंदू म्हात्रे; शिवसेना (शिंदे गट)चे गजानन पाटील, विकास म्हात्रे, मलेश शेट्टी, जयवंत भोईर, नवीन गवळी, महेश गायकवाड, गणेश लांडगे, विजया पोटे तसेच उबाठा शिवसेनेचे विशाल गारवे यांचा समावेश आहे.
शिक्षण समितीसाठीही सर्व पक्षांकडून प्रस्ताव मागवून सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये शिवसेना (शिंदे गट)च्या रेखा म्हात्रे, ज्योती मराठे, अस्मिता मोरे, सारिका जाधव, रसिका संदेश पाटील; भाजपच्या पूजा गायकवाड, डॉ. सुनिता पाटील, रवीना माळी, मेघा खेमा, सरोज राय तसेच उबाठा शिवसेनेच्या तेजश्री गायकवाड यांचा समावेश आहे.
दरम्यान, सभागृहनेतेपदी भाजपचे वरुण पाटील यांची घोषणा महापौर हर्षाली चौधरी यांनी केली. महासभेत उपस्थित विविध विषयांवर पुढील स्वतंत्र महासभेत सविस्तर चर्चा करून निर्णय घेतले जातील, अशी माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली.









Leave a Reply