टिटवाळा : टिटवाळा-मांडा परिसरात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असून रस्त्यालगतच्या झाडांच्या वाढलेल्या फांद्या आणि वीजवाहिन्यांवर झुकलेली झाडे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका ठरत आहेत. विशेषतः पावसाळा आणि वादळी वाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर या समस्येचे गांभीर्य अधिक वाढले आहे. शॉर्टसर्किट, आग लागणे तसेच अपघात होण्याची शक्यता वाढत असताना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात धोकादायक झाडांच्या फांद्या तात्काळ छाटणे, वीजवाहिन्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करणे आणि संपूर्ण परिसराची पाहणी करून संभाव्य अपघात टाळण्यासाठी त्वरित कारवाई करण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे.
सध्या परिसरातील नागरिकांना वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, घरगुती उपकरणांचे नुकसान होणे, तसेच लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ही समस्या केवळ असुविधेपुरती मर्यादित न राहता ती आता गंभीर सुरक्षेच्या मुद्द्यात परिवर्तित झाली आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून कामे सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे कामाचा वेग मंद असल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत काम पूर्ण करण्याचा दावा करण्यात आला असला तरी नागरिकांमध्ये अस्वस्थता कायम आहे.
जर तातडीने ठोस पावले उचलली नाहीत, तर आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. निवेदन सादर करताना दिलीप राठोड, अविनाश शिळकंदे आणि भाऊसाहेब घोडके उपस्थित होते.









Leave a Reply