मांडा–टिटवाळा परिसरात नव्या शक्तीचा उदय; स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेण्याचा निर्धार
टिटवाळा मनसे पक्षप्रवेश ही मोठी राजकीय घडामोड ठरली असून मांडा परिसरातील शेकडो नागरिकांनी मनसेत प्रवेश करत स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण केले
टिटवाळा : टिटवाळा (मांडा परिसर) येथे विविध क्षेत्रातील शेकडो नागरिकांनी एकत्र येत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पक्षात प्रवेश केल्याची मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. हा पक्षप्रवेश ठाणे येथे पार पडला असून उल्हास भोईर आणि सुनीता सासे यांच्या नेतृत्वाखाली युवक, व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांशी संबंधित नागरिकांनी मनसेत प्रवेश केला. या घडामोडीमुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चिन्हे दिसू लागली आहेत.
ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. त्यांच्या हस्ते नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला अविनाश शिळकंदे, दिलीप राठोड यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षप्रवेशाच्या वेळी दिलीप राठोड आणि अविनाश शिळकंदे यांनी स्पष्ट केले की, टिटवाळा परिसरातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि विकासाला गती देण्यासाठी मनसेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक समस्यांवर आक्रमक भूमिका घेत नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
अविनाश जाधव यांनीही टिटवाळ्यात मनसेची ताकद वाढत असल्याचे नमूद करत नव्या कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे संघटना अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला. आगामी काळात मनसे स्थानिक पातळीवर निर्णायक भूमिका बजावेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पक्षप्रवेशानंतर नव्या कार्यकर्त्यांनी टिटवाळा परिसरातील बेरोजगारी, पायाभूत सुविधांची कमतरता आणि प्रलंबित प्रश्नांवर ठोस भूमिका घेण्याचा निर्धार व्यक्त केला. “टिटवाळ्यात बदल घडवून आणणार,” असा संदेश या वेळी देण्यात आला. या भव्य पक्षप्रवेशामुळे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रस्थापित राजकीय पक्षांसमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मनसेच्या या शक्तिप्रदर्शनामुळे टिटवाळ्यातील राजकीय वातावरण अधिक चुरशीचे होण्याची चिन्हे दिसत असून, पुढील काळात नवीन राजकीय समीकरणे तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, या घडामोडींना अधिकच राजकीय रंग चढवणारी महत्त्वाची बाब म्हणजे शिवसेना शिंदे गटाला कल्याण–टिटवाळा परिसरात मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे. शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केल्याने स्थानिक पातळीवर मोठी गळती झाल्याचे मानले जात आहे. कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास महादेव भोईर यांच्या नेतृत्वाखाली, ठाणे जिल्हाध्यक्ष व नेते अविनाश जाधव तसेच टिटवाळा उपविभाग अध्यक्ष धनंजय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. या घडामोडीमुळे येत्या काळात कल्याण–टिटवाळ्यातील राजकीय समीकरणांमध्ये आणखी मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









Leave a Reply