पंजाब मेलखाली व्यक्तीचा मृत्यू; तासभर गाड्या ठप्प — महिला प्रवाशांमध्ये भीतीचे सावट, रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
टिटवाळा परिसरातील धक्कादायक घटना; संशयास्पद हालचालींमुळे महिला डब्यात दहशत
टिटवाळा : कल्याण तालुक्यातील टिटवाळा जवळ बुधवारी (२६ मार्च) रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या एका गंभीर घटनेमुळे रेल्वे वाहतूक काही काळ ठप्प झाली आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पंजाब मेल या लांब पल्ल्याच्या गाडीखाली एक व्यक्ती आल्याने चालकाने तत्काळ ब्रेक मारत गाडी थांबवली. मात्र, या दुर्घटनेत त्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेनंतर संबंधित व्यक्तीला रुळांवरून बाहेर काढणे आणि गाडी पुन्हा सुरू करण्यासाठी सुमारे एक ते दीड तासाचा कालावधी लागला. या काळात मागील सर्व गाड्या जागच्या जागी थांबल्या होत्या. या थांबलेल्या गाड्यांपैकी एका लोकलच्या शेवटच्या महिला डब्याजवळ काही संशयास्पद व्यक्ती फिरताना दिसल्याने महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
बनेली परिसराच्या दिशेने आलेल्या या व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने, महिला प्रवाशांनी तत्परता दाखवत डब्याचे सर्व दरवाजे आतून बंद करून घेतले. गाडी टिटवाळा स्थानकात पोहोचेपर्यंत त्यांनी दरवाजे उघडले नाहीत. सुदैवाने, या संपूर्ण प्रसंगात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, त्या काळात महिलांमध्ये प्रचंड भीती आणि अस्वस्थता होती. ही माहिती त्या गाडीत प्रवास करणाऱ्या टिटवाळा येथील एका महिलेने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
या संपूर्ण घटनेदरम्यान रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही स्पष्ट घोषणा करण्यात आली नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम आणि भीती अधिकच वाढली. तासभर गाड्या थांबलेल्या असताना, नेमकी परिस्थिती काय आहे याबाबत प्रवाशांना माहिती देणे, तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक सूचना देणे अपेक्षित होते. विशेषतः महिला डब्यांतील प्रवाशांसाठी दरवाजे बंद ठेवण्यासारख्या सूचनांची घोषणा करणे अत्यंत गरजेचे होते, अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केली.
या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाच्या आपत्कालीन व्यवस्थापनावर आणि प्रवासी सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भविष्यात अशा घटना घडल्यास, तात्काळ आणि प्रभावी उद्घोषणा करून प्रवाशांना धीर देणे, तसेच सुरक्षा उपायांची माहिती देणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकारानंतर तरी रेल्वे प्रशासनाने जागरूक होत प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत अशा प्रसंगी योग्य ती माहिती व मार्गदर्शन देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.














Leave a Reply