टिटवाळा: अजय शेलार
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. त्याच अनुषंगाने कल्याण तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील गाळेगाव, तरे मार्केट परिसर, बुद्ध विहार आदी संवेदनशील भागांमध्ये पोलिसांनी दमदार एरिया डॉमिनेशन करत रूट मार्च काढला.
या रूट मार्चमध्ये पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी, अंमलदार तसेच RCP प्लाटून सहभागी झाले होते. शिस्तबद्ध पावलांनी, कडक बंदोबस्तात काढलेल्या या रूट मार्चमुळे परिसरात पोलिसांचा ठाम वचक निर्माण झाला. कोणत्याही अनुचित प्रकारास आळा बसावा, निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी आणि नागरिकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
रस्त्यांवर ठिकठिकाणी पोलिसांची उपस्थिती, सतत गस्त आणि रूट मार्चमुळे असामाजिक घटकांमध्ये दहशत पसरली असून, सामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे. आगामी निवडणुकीच्या काळातही अशाच प्रकारे कडक कारवाई, सतर्कता आणि प्रभावी बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
“निवडणूक काळात कायदा मोडणाऱ्यांना कुठलीही तडजोड नाही”—असा ठाम संदेश या रूट मार्चमधून देण्यात आला आहे.
डॉ. डी. एस. स्वामी (पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण) यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल आणि अनिल लाड (उपविभागीय पोलीस अधिकारी, मुरबाड विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पंकज गिरी (पोलीस निरीक्षक, कल्याण तालुका पोलीस ठाणे) यांच्या नेतृत्वाखाली या रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते .
















Leave a Reply