दोन झेंड्यांतून उमटले एकतेचे प्रतिबिंब

Img 20251106 wa0013

टिटवाळा : अजय शेलार 

निवडणुकीचा ज्वर चढला आहे. गल्लोगल्ली पक्षांचे बॅनर-झेंडे, प्रचाराच्या मिरवणुका याचे नियोजन आता बांधले जाईल ,वातावरण तापेल . प्रत्येक गट स्वतःचा रंग उंच फडकवत दुसऱ्याला हरवण्याची धडपड करताना दिसेल , पण या राजकीय गदारोळात, टिटवाळ्याच्या एका छोट्याशा वस्तीत दोन झेंडे — एक भगवा आणि एक निळा — शांतपणे एकमेकांच्या शेजारी फडफडताना दिसतात. आणि हे दृश्य जणू सांगून जातं, की मतभेद असले तरी मनभेद नाहीत. हे झेंडे एकमेकांविरुद्ध नव्हेत, तर एकत्र उभे आहेत — जणू दोन विचारधारा एकाच आकाशाखाली सन्मानाने सहअस्तित्व मान्य करत आहेत. त्यांच्या फडफडण्यात वाऱ्याचा आवाज नाही, तर समजुतीचा श्वास आहे. एक झेंडा अध्यात्म, संस्कृती, आणि परंपरेचा वारसा सांगतो; तर दुसरा समता, न्याय, आणि बंधुत्वाचा संदेश देतो . दोघेही एकाच आकाशाखाली डौलाने फडकताना जणू सांगतात — “आम्ही वेगळे नाहीत, आम्ही एक आहोत!”

गावातील रहिवासी सांगतात, की येथे कोणाच्याही घराबाहेर कोणता झेंडा फडकतो, यावरून नातं ठरत नाही. या वस्तीत लोक एकत्र गणेशोत्सव साजरा करतात, आणि एकत्रच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती किंवा शिवजयंतीदेखील साजरी करतात. सण कोणताही असो, पण आनंद सर्वांचा असतो. दुःख आलं की सगळे एकत्र धावतात, मदतीचा हात पुढे करतात. या साध्या माणसांसाठी झेंड्यांचा रंग नाही, नातं महत्त्वाचं आहे. आज जेव्हा राजकारण समाजाला ‘आपले-त्यांचे’, ‘बहुसंख्य-अल्पसंख्य’, ‘भगवे-निळे’ अशा ओळीत विभागण्याचा प्रयत्न करतं, तेव्हा या वस्तीतले दोन झेंडे निःशब्दपणे सांगतात —

“विचार वेगळे असले तरी माती एकच आहे,
ध्वज वेगळे असले तरी आकाश एकच आहे.”

 

हे दृश्य पाहणारा प्रत्येकजण थोडावेळ थांबतो, मनन करतो. कारण हे झेंडे फक्त वस्त्र नाहीत ते आपल्या समाजातील समज, सहिष्णुता आणि सहअस्तित्वाचं प्रतीक आहेत. राजकीय नेते बदलतात, पक्ष येतात-जातात, पण या माणसांच्या मनातली माणुसकी टिकून राहते. आज भारताला गरज आहे ती अशाच छोट्या उदाहरणांची — जिथे झेंडे भांडत नाहीत, तर एकत्र उभे राहतात. जिथे विचारभेद असूनही प्रेमभेद नाही. या दोन झेंड्यांच्या सावलीत अजूनही भारताचं खरं बळ जिवंत आहे — माणुसकी, बंधुत्व आणि एकतेचं बळ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *