डोंबिवलीच्या दोन नाट्यसंघांचा राज्यात पहिला क्रमांक; दुहेरी यशाचा जल्लोष

६४वी राज्य हौशी नाट्य स्पर्धा आणि २२वी बालनाट्य स्पर्धेत दमदार कामगिरी; कलाकारांचा विशेष सत्कार

६४वी राज्य हौशी नाट्य स्पर्धा आणि २२वी बालनाट्य स्पर्धेत दमदार कामगिरी; कलाकारांचा विशेष सत्कार


डोंबिवली : डोंबिवलीतील दोन नाट्यसंघांनी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धा आणि बालनाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत दुहेरी यश मिळवले असून या विजेत्या संघांचा विशेष सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. पै फ्रेंड्स लायब्ररी आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला.

या सोहळ्यात श्रीकला संस्कार न्यास संस्थेच्या संपदा जोगळेकर कुळकर्णी लिखित ‘दगडी भिंत’ या नाटकाचा तसेच गुरुकुल द डे स्कूलच्या ‘लिझल’स सिक्रेट’ या बालनाट्याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री पुंडलिक पै, श्री माधव जोशी, ॲड. सुहास तेलंग, डॉ. संदीप आणि प्रा. मंजिरी घरत यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी गुरुकुल द डे स्कूलचे संस्थापक अजित करकरे यांनी या यशामागील मेहनत, अभ्यास आणि सातत्याचे महत्त्व अधोरेखित केले. ‘दगडी भिंत’ नाटकाचे दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक आशुतोष वाघमारे यांनी या यशाचे श्रेय कल्याण-डोंबिवलीतील प्रेक्षक आणि नाट्यकर्मी यांना दिले.

स्पर्धेत ‘दगडी भिंत’ नाटकाने अनेक वैयक्तिक पारितोषिकेही पटकावली. आशुतोष वाघमारे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन व संगीत दिग्दर्शन (प्रथम), वृषांक कवठेकर यांना नेपथ्य (प्रथम), विनोद राठोड यांना प्रकाशयोजना (प्रथम), उल्लेश खंदारे यांना रंगभूषा (प्रथम), तर श्रुती गणपुले आणि निखिला इनामदार यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (रौप्यपदक) पुरस्कार मिळाले.

तसेच बालनाट्य स्पर्धेत ‘लिझल’स सिक्रेट’ या नाटकानेही बाजी मारली. वृषांक कवठेकर (दिग्दर्शन-प्रथम), आशुतोष वाघमारे (संगीत-द्वितीय), विनोद राठोड (प्रकाशयोजना-तृतीय), दिया गीते (सर्वोत्कृष्ट अभिनेत्री-रौप्यपदक) आणि अर्णव कुलकर्णी (सर्वोत्कृष्ट अभिनेता-रौप्यपदक) यांचा सन्मान करण्यात आला.

नाट्यक्षेत्रातील या दुहेरी यशामुळे कल्याण-डोंबिवली परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून नाट्यप्रेमींनी सर्व विजेत्या कलाकारांचे कौतुक करत अभिमान व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *