गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर साई पालखीचे प्रस्थान; आटाली कोळीवाड्यातून 26व्या वर्षी भक्तिभावाने सुरुवात

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर साई पालखीचे प्रस्थान; आटाली कोळीवाड्यात भक्तिभावाचा उत्सव

कल्याण : स्वप्नील शिंदे 

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आटाली कोळीवाडा येथील ओम साई दत्त सेवा मंडळाच्या वतीने साई बाबांच्या पालखी सोहळ्याची भक्तिभावाने सुरुवात करण्यात आली. यंदा या पालखी सोहळ्याचे 26वे वर्ष असून, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात मिरवणूक काढण्यात आली.

मंडळाचे अध्यक्ष मुकुंद पांडुरंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत साई बाबांच्या पालखीचे विधिवत पूजन केले. त्यानंतर आटाली गावातून पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला. या भव्य मिरवणुकीत कै. गजानन हिरू पाटील शाळेच्या लेझीम पथकाने आपली आकर्षक कला सादर करत वातावरण दणाणून सोडले, तर स्वर गंध ब्रास बँडच्या मधुर संगीताने भक्तीमय रंग अधिकच खुलला. याशिवाय महिला भजनी मंडळानेही सहभाग घेत भजन-कीर्तनाच्या माध्यमातून संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. ग्रामस्थ आणि साई भक्त मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते. भक्तांच्या जयघोषात आणि साईनामाच्या गजरात निघालेली ही पालखी आटाली ते टिटवाळा मार्गे प्रवास करत राम नवमीपर्यंत शिर्डी येथे पोहोचणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.या धार्मिक परंपरेमुळे गावात एकात्मता, श्रद्धा आणि भक्तीचा सुंदर संगम पाहायला मिळत असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सोहळा भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

व्हिडीओ पहा : https://www.youtube.com/watch?v=dhi3Ox4MiPY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *