लेखक : पत्रकार – अजय शेलार (टिटवाळा)
प्रभाकर उर्फ पिंट्या भोईर, — मांडा टिटवळा गावातील एक साधा, पण माणुसकीने भरलेला चेहरा. सोमवार दिनांक २ फेब्रुवारी रोजी वयाच्या अवघ्या ४४ व्या वर्षांत त्यांचे दुःखद निधन झाले आणि त्या बातमीने केवळ त्यांचे कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण परिसर हळहळला. पिंट्या आणि माझी ओळख तब्बल पंचवीस वर्षांची. मी जेव्हा टिटवाळा येथे राह्यला आलो, तेव्हा मिळालेला पहिला मित्र म्हणजे पिंट्या. पुढे अनेक मित्र जोडले गेले, पण त्या सगळ्या वर्तुळात पिंट्या आपोआप सामील होत गेला — कुठलीही औपचारिकता नाही, कुठलाही दिखावा नाही. आमच्या सोसायटीच्या बाजूच्या शेतात तो गुरं चरायला यायचा. तिथे दिसला की लांबूनच त्याचा ओळखीचा, आपुलकीचा आवाज येई — “काय हो, पत्रकार साहेब, कसे आहात?” विचारपूस करणारा आपुलकीचा हा प्रश्न केवळ मलाच नाही, तर रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या कुठल्याही माणसालाही . क्षणात समोरचा आपलासा व्हायचा. दोन शब्द बोलले तरी माणूस त्याचा होऊन जायचा, अशी जादू त्याच्यात होती.
भाजीच्या छोट्याशा दुकानातून तो आपला उदरनिर्वाह चालवत होता. मोठे व्यवसाय नाहीत, मोठे पद नाही, मोठी श्रीमंती नाही — पण कष्ट, प्रामाणिकपणा, नीतिमत्ता आणि माणसांवर प्रेम यांची श्रीमंती त्याच्याकडे ओसंडून वाहत होती. तो कष्टाळू होता, मेहनती होता, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो माणूस होता — खऱ्या अर्थाने.
त्याच्या अंत्ययात्रेला जमलेली गर्दी पाहून अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले. इतकी माणसं मोठमोठ्या प्रतिष्ठित लोकांच्या अंत्ययात्रेलाही जमत नाहीत. त्या क्षणी जाणवलं — पिंट्याने आयुष्यात काहीच कमावलं नाही असं नाही; त्याने माणसं कमावली होती. तीच त्याची खरी संपत्ती होती. कोणत्याही बँकेत न मोजता येणारी, पण काळजाच्या कप्प्यात कायम राहणारी. हे सारे पाहून आपोआपच शब्द निघाले मुखातून तो निघालाय जगातला सर्वात श्रीमंत माणूस ज्याची खरी संपत्ती होती त्याला अखेरचा निरोप देण्यासाठी आलेली ही कोण कुठली माणसे .
आणखी एक गोष्ट त्या दिवशी ठळकपणे जाणवली. पिंट्याच्या अंत्ययात्रेला जमलेली माणसं ही केवळ त्याच्या नात्यातली किंवा गावातलीच नव्हती. ती माणसं होती जी वेगवेगळ्या गावांतून, पारगावतून टिटवाळ्यात वास्तव्यास आलेली होती. ना रक्ताचं नातं, ना बालपणाची ओळख — फक्त पिंट्याची आपुलकी. त्याने दिलेला प्रेमळ शब्द, चौकशीचा प्रश्न, हसरा चेहरा… एवढंच त्यांना खेचून आणण्यासाठी पुरेसं होतं. ही माणसं त्याने स्वभावाने जिंकलेली होती. म्हणूनच त्या दिवशी एक गोष्ट ठामपणे उमगली — पिंट्या कोणाच्या घरात जन्मला होता, हे महत्त्वाचं नव्हतं; तो प्रत्येकाच्या काळजात राहायला शिकला होता. आणि म्हणूनच त्या जमलेल्या माणसांनी शांतपणे, डोळ्यांत पाणी ठेवून, त्याला शेवटचा निरोप दिला. म्हणूनच माझ्या लेखणीला देखील अश्या सुंदर काळाजाने भरलेल्या माणसाबद्दल लिहिण्याचा मोह आवरला नाही.
पिंट्या आज आपल्यात नाही, ही पोकळी भरून निघणारी नाही. पण त्याची आपुलकी, त्याचा हसरा चेहरा, त्याचा आवाज, आणि माणसाला माणूस म्हणून पाहण्याची त्याची वृत्ती — हे सगळं कायम स्मरणात राहील. त्याचं आयुष्य आपल्याला एक साधा पण मोठा धडा देऊन गेलं — माणूस मोठा व्हायला पद, पैसा नाही; माणुसकी लागते.
प्रभाकर उर्फ पिंट्या भोईर यांना ही शब्दांमधून वाहिलेली भावपूर्ण श्रद्धांजली.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची ताकद देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏















Leave a Reply