५ जून २०२१ साली प्रकाशित झालेला ‘संवेदनांची वेदना’ हा अविनाश पाटील यांनी संकलन केलेला काव्यसंग्रह आज माझ्या हाती लागला….सुंदर असे मुखपृष्ठ असलेले आणि प्रसिद्ध लेखक, कवी असलेले अरविंद जगताप (चला हवा येऊ द्या मधील पोस्टमनकाका या पात्राचे पत्र लेखन करणारे )…यांच्या कवितेने शेवट करणारे प्रत्येकाने संग्रही ठेवावे इतके सुंदर हे पुस्तक आहे .
केवळ झाड या विषयाला धरून संग्रहित कविता असलेल्या या पुस्तकाचे वाचन करताना आपल्या अंतर्मनात असलेले झाड कधी हिरवे होते कळतच नाही… या बहरणाऱ्या, तर कधी मुसमूसणाऱ्या, अगदी हळव्या…तर कधी गहिवरलेल्या या झाडावर माझ्या कवितेची ही एक फांदी आहे , याचा मला अपार आनंद आहे…’अंघोळीची गोळी’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि पर्यावरणाच्या शाश्वत विकासासाठी सातत्याने काम सुरु आहे. पर्यावरण संतुलन टिकवण्यासाठी वृक्षांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. म्हणूनच केवळ वृक्षारोपण करणे पुरेसे नाही, तर त्या झाडांचे संगोपन करणेही तितकेच गरजेचे आहे.
वृक्षांच्या छायेखाली वाढलेल्या आपल्या संस्कृतीत वृक्षांना केवळ पर्यावरणपूरक घटक म्हणून न पाहता, त्यांना आपला सोबती मानले आहे. वृक्ष आपल्याला सावली देतात, ऑक्सिजन देतात आणि निसर्गाच्या चक्रात अनमोल योगदान देतात. याच वृक्षांबद्दल आपुलकी, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची गरज आहे. ‘संवेदनांची वेदना’ हा काव्यसंग्रह याच भावनांना शब्दरूप देतो. वृक्षांवरील कविता आपल्याला निसर्गाच्या सान्निध्यातील नात्याची जाणीव करून देतात. वृक्षसंवर्धन हा केवळ सामाजिक उपक्रम नसून, तो आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनला पाहिजे. या काव्यसंग्रहातील प्रत्येक कविता एक नवीन प्रेरणा देईल. निसर्गाची भाषा समजणाऱ्या आणि न समजणाऱ्या प्रत्येक संवेदनशील व्यक्तीच्या आत असलेले एक अबोल झाड बोलते करेल असा दृढ विश्वास आहे .
– अजय शेलार











Leave a Reply