कल्याण, ता. १३ एप्रिल – रोशन उबाळे
कल्याण पूर्वेतील लोकधारा-सह्याद्री भागात राहणाऱ्या एका ५४ वर्षीय शिक्षकाला सोन्यात गुंतवणुकीच्या नावाखाली १० ते २० टक्के वाढीव नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ६६ लाख १० हजार रुपयांनी गंडविण्यात आले. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या तपासात व्यस्त आहेत.
शिक्षकाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एका अनोळखी महिलेकडून मैत्रीची विनंती आली. ती स्वीकारल्यानंतर महिलेने एका बीअरस्टीर (Bear Steer) नावाच्या संकेतस्थळाची लिंक पाठवली आणि सोन्यात गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल असे सांगितले. सुरुवातीला ऑनलाईन संवाद साधत शिक्षकाचा विश्वास संपादन केला.
महिलेने दोन वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून शिक्षकाशी संपर्क साधत सातत्याने गुंतवणुकीसाठी रक्कम पाठवण्यास भाग पाडले. फेब्रुवारी ते मार्च २०२५ या कालावधीत शिक्षकाने टप्प्याटप्प्याने ६६ लाख १० हजार रुपये महिलेने दिलेल्या बँक खात्यांमध्ये वळते केले.
नफा मागितल्यावर सुरू झाला टाळाटाळीचा खेळ
रक्कम भरल्यानंतर शिक्षकाने गुंतवणुकीवरील नफ्याची मागणी केली असता, महिलेने वारंवार कारणे देत वेळकाढूपणा सुरू केला. शेवटी संपर्क टाळत दोन्ही मोबाईल क्रमांक बंद करून तिने पूर्णतः गायब झाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिक्षकाने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पोलीस माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास करत आहेत. पोलिसांनी महिलेचा ठावठिकाणा आणि शिक्षकाने वळवलेली रक्कम कोणत्या खात्यांमध्ये जमा झाली, याचा तपास सुरू केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक कार्यरत आहे.
कल्याण-डोंबिवलीत ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढत्या
सोन्यातील गुंतवणुकीच्या बहाण्याने मोठ्या प्रमाणावर लोकांची फसवणूक केली जात असल्याच्या घटना कल्याण-डोंबिवली परिसरात वाढू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी डोंबिवली पांडुरंगवाडी भागात एका सेवानिवृत्त व्यक्तीची लाखो रुपयांची फसवणूक झाली होती. तसेच डोंबिवली पश्चिमेत पर्यटन कंपनी व खासगी गुंतवणूक सल्लागारांनी कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याची प्रकरणे समोर आली आहेत.














Leave a Reply