टिटवाळा : शंखेश्वर क्रिस्टल कंपनीमध्ये नोकरी व कमी दरात सामान देण्याचे आमिष दाखवून टिटवाळ्यातील चामसिटी परिसरातील एका इमारतीतील अनेक रहिवाशांची सुमारे १३,९९,४२५/- रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात नविन धनाजी पांचाळ व त्याची पत्नी विद्या पांचाळ यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रारदार जितेंद्र बांगर (वय ४०), व्यवसायाने खाजगी बँकेत नोकरी करणारे, यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जानेवारी २०२५ पासून आरोपी नविन पांचाळ व त्याची पत्नी त्यांच्या इमारतीत भाड्याने राहू लागले होते. त्यांनी फिर्यादीसह इमारतीतील अनेक रहिवाशांशी ओळख वाढवून शंखेश्वर क्रिस्टल कंपनीत नोकरी व घरपोच कमी दरात सामान मिळवून देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला फिर्यादीने विश्वास ठेऊन ५,५००/- रुपये दिल्यानंतर त्यांना काही सामान मिळाले. त्यानंतर अधिक नफा व पगार मिळेल या आमिषाने त्यांनी २,८६,०००/- रुपये रोख व पुढे ऑनलाईन पद्धतीने ४३,७००/- रुपये पाठवले. मात्र, त्यानंतर आरोपीने कोणताही संपर्क टाळला.
२६ मार्च २०२५ रोजी पहाटे ४ वाजता सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी एका पांढऱ्या रंगाच्या एर्टीगा गाडीतून (MH05/EL/3084) सामानासह इमारतीतून निघून जाताना दिसला. अधिक चौकशीत असे उघड झाले की, आरोपीने एकट्या जितेंद्र बांगर यांच्याकडूनच नव्हे तर इमारतीतील इतर २२ रहिवाशांकडून देखील वेगवेगळ्या रकमेची फसवणूक केली आहे. एकूण मिळून १३,९९,४२५/- रुपयांची फसवणूक झाली आहे. तक्रारदार व इतर रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने जाणीवपूर्वक खोटी माहिती देत त्यांच्याकडून पैसे उकळून पलायन केले आहे. सदर प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी गुन्हे शाखेच्या तपासाअंती सोलापूर विभागातून कुख्यात ‘बंटी-बबली’ जोडगोळीला अखेर ताब्यात घेतलं आहे. या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आलेली ही कारवाई गुरुवार, दिनांक १८ एप्रिल २०२५ रोजी करण्यात आली. अटक केलेल्या दोघांना टिटवाळा पोलिस स्टेशनमध्ये हजर करण्यात आले असून त्यांच्याकडून पुढील सखोल चौकशी सुरू आहे.
या जोडगोळीवर राज्यातील विविध भागांमध्ये अनेक फसवणूक व चोरीच्या प्रकरणांमध्ये सहभाग असल्याचा संशय आहे. पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली असून, सोलापूर विभागातील त्यांच्या लपण्याच्या ठिकाणी छापा टाकून त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, हेड कॉन्स्टेबल मुस्ताक रज्जाक करीत आहेत.















Leave a Reply