बनावट नोटांच्या आमिषाने ५ लाखांची लूट; कोळसेवाडी पोलिसांनी आठ जणांच्या टोळीला तासांत अटक

कल्याण पूर्वेत बनावट नोटांच्या आमिषाने ५ लाखांची लूट; कोळसेवाडी पोलिसांचा वेगवान तपास, आठ आरोपी जेरबंद

कल्याण : रोशन उबाळे

कल्याण पूर्व परिसरात बनावट नोटांच्या व्यवहाराचे आमिष दाखवत तब्बल पाच लाख रुपयांची लूट करणाऱ्या टोळीचा कोळसेवाडी पोलिसांनी काही तासांतच पर्दाफाश केला. पोलिसांच्या चपळ कारवाईमुळे आठ जणांच्या टोळीला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून रोख रक्कम, दोन स्कॉर्पिओ गाड्या आणि अनेक मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात तक्रारदार दीपक शिंदे (रा. वाघोली, पुणे) यांना आरोपींनी मोठ्या रकमेचे आमिष दाखवत संपर्क साधला होता. सात लाख रुपयांच्या बदल्यात दहा लाख दहा हजार रुपये देण्याचे आश्वासन देत आरोपींनी त्यांना कल्याण पूर्व येथे बोलावले. ठरलेल्या व्यवहारासाठी शिंदे पाच लाख रुपयांची रक्कम घेऊन विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक परिसरात पोहोचले. याच वेळी स्कॉर्पिओ वाहनातून आलेल्या काही व्यक्तींनी स्वतःला पोलिस असल्याचे भासवले. अचानक कारवाईच्या नावाखाली त्यांनी शिंदे यांच्या हातातील पैशांची बॅग हिसकावून घेतली आणि क्षणार्धात तेथून पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपासाची सूत्रे हाती घेतली. गुन्हा क्रमांक १०३/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून पोलिसांनी आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली. तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांची ओळख पटवली.

तपासादरम्यान संजय नागोजीराव भोसले (रा. गौरीपाडा, कल्याण), गॉसपाक गुलाम हुसेन शेख (रा. गौरीपाडा, कल्याण), सोमनाथ तुळशीराम गायकवाड (रा. मोहने, आंबिवली पूर्व) आणि अरविंद नाथा जोज्जट (रा. इंदिरानगर, कल्याण पश्चिम) यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले. दरम्यान इतर आरोपी दुसऱ्या स्कॉर्पिओ वाहनातून अहमदनगरच्या दिशेने पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

यानंतर अहमदनगर-शिर्डी मार्गावर नाकाबंदी करून पोलिसांनी पुढील आरोपींना अटक केली. यात उमाशंकर हनुमानप्रसाद पांडे उर्फ पप्पू पांडे (रा. वडोळगाव, उल्हासनगर), शरदकुमार मोहन (रा. ओटी सेक्शन, उल्हासनगर), नरेश पद्दू शर्मा (रा. ओटी सेक्शन, उल्हासनगर) आणि लक्ष्मण उर्फ प्रदीप विश्वनाथ धनवे (रा. उल्हासनगर) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून लुटीतील दोन लाख छत्तीस हजार रुपयांची रक्कम, दोन स्कॉर्पिओ वाहने आणि एकूण दहा मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम आणि या गुन्ह्यातील इतर साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत गुरव आणि गुन्हे निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलिसांच्या विशेष पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *