डोंबिवली : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यासाठी इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली वेस्टतर्फे ‘कल्याणी पुरस्कार’ आणि ‘वात्सल्य पुरस्कार’ प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शनिवारी (दि.७ मार्च) सायंकाळी येथील गणेश मंदिरातील विनायक सभागृहात झालेल्या या सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती लाभली आणि स्त्रीशक्तीच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
कल्याण-डोंबिवली परिसरात गेली अठरा वर्षे कार्यरत असलेली इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट ही संस्था समाजातील दुर्बल घटकांतील महिलांच्या सबलीकरणासाठी सातत्याने कार्य करत आहे. समाजकार्यात पुढाकार घेणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या कार्याचा गौरव करणे आणि समाजात सकारात्मक प्रेरणा निर्माण करणे या उद्देशाने क्लबतर्फे विविध उपक्रम राबवले जातात. त्यापैकी ‘कल्याणी’ आणि ‘वात्सल्य’ पुरस्कार प्रदान सोहळा हा गेल्या तेरा वर्षांपासून सातत्याने आयोजित केला जाणारा एक महत्त्वाचा उपक्रम ठरला आहे. यंदाचा हा चौदावा सोहळा अत्यंत नेटकेपणाने आणि उत्साही वातावरणात पार पडला.
इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली वेस्टच्या माजी सक्रिय सदस्या आणि माजी नगरसेविका कै. सौ. राजश्री काळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या पुरस्कारांची परंपरा सुरू करण्यात आली. त्यांच्या समाजसेवेच्या कार्याची आठवण जपण्यासाठी चौदा वर्षांपूर्वी या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली होती. राजश्रीताईंचे सुपुत्र रो. दीपक काळे यांनी आपल्या मातोश्रींच्या स्मृतीचा मान राखत ही परंपरा दरवर्षी मोठ्या निष्ठेने सुरू ठेवली आहे.
या समारंभाला संतसाहित्य अभ्यासक, लेखिका व प्रवचनकर्त्या अलकाताई मुतालिक यांनी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा लक्ष्मी चैनी यांनी सुबोध आणि ओघवत्या मराठीत उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला.
यंदाचा ‘कल्याणी पुरस्कार’ हम चॅरिटेबल ट्रस्टच्या गौरी जोशी यांना प्रदान करण्यात आला, तर ‘वात्सल्य पुरस्कार’ साई बाल संगोपन केंद्राच्या सुविधा दांडेकर यांना देण्यात आला. ओटी, फळांची करंडी, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्कारांचे स्वरूप होते. रो. डॉ. प्रल्हाद देशपांडे यांनी शब्दबद्ध केलेल्या मानपत्रांचे वाचन तृप्ती देगांवकर आणि रेखा बुचडे यांनी केले.
पुरस्कार स्विकारताना गौरी जोशी यांनी ‘हम’ ट्रस्टच्या कार्याची माहिती देताना सांगितले की, भारताच्या सीमावर्ती भागातील नागरिकांना देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याच्या उद्देशाने ‘जोडो काश्मीर’ हे ब्रीदवाक्य संस्थेने स्वीकारले आहे. जम्मू-काश्मीरमधील नैसर्गिक आपत्ती आणि दहशतवादी कारवायांमुळे प्रभावित झालेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण, त्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी त्यांचा संवाद घडवून आणणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सीमावर्ती भागातील शाळांमध्ये जीवशास्त्र, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळा उभारणे तसेच दुर्गम भागात प्राथमिक शाळा सुरू करणे अशा विविध उपक्रमांद्वारे संस्थेने उल्लेखनीय कार्य केले आहे.
वात्सल्य पुरस्काराच्या मानकरी सुविधा दांडेकर यांच्या वतीने ओंकार साई बाल संगोपन केंद्राचे अनिकेत सर यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी माईंच्या समर्पित जीवनकार्याची आणि अनाथ व गरजू मुलांना दिलेल्या संस्कारांची माहिती देत त्यांच्या कार्याची महती सांगितली.
कल्पना देशमुख यांनी करून दिलेल्या अल्प परिचयानंतर अध्यक्षीय भाषणात बोलताना अलकाताई मुतालिक यांनी स्त्रीशक्तीचे महत्त्व अधोरेखित केले. विनोबा भावे यांच्या “क्षणभोगी हे क्षण विश्वाची मी” या उक्तीचा संदर्भ देत त्यांनी स्त्रीचे कर्तृत्व, त्याग आणि कुटुंब व समाज घडवण्यात तिची भूमिका प्रभावी शब्दांत मांडली. ‘यत्र नारी तत्र पूज्यते’ या विचाराचा दाखला देत स्त्रीच्या सामर्थ्याची अनेक उदाहरणे त्यांनी रसाळ आणि ओघवत्या शैलीत सांगितली. संत रामदास स्वामींच्या विवाहवेदीवरील प्रसंगाचा उल्लेख करत त्यांच्या पत्नीने शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी तरुण मावळ्यांची भरती करण्यासाठी केलेल्या कार्याचा दाखला देत स्त्रीच्या धैर्याची आणि राष्ट्रीयतेची जाणीव उपस्थितांना करून दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प प्रमुख गीता कुलकर्णी यांनी केले, तर राजसी मोहिते यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. या समारंभाला इनरव्हील क्लबच्या अनेक सदस्या, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्टचे अध्यक्ष अतुल गोखले, माजी अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, दत्ता कडुलकर, दीपक काळे, अनघा चक्रदेव, रो. अतुल चक्रदेव, टिळकनगरचे समाजसेवक रो. संदीप वैद्य, सौदामिनी क्लबच्या सुषमा घोलप, माजी नगरसेविका मंगला सुळे, हम ट्रस्टच्या नंदिनी पित्रे, शर्वरी जोशी, विवेकानंद सेवा मंडळाच्या सानिका परब, सक्षम फाऊंडेशनच्या मंगला गायकवाड आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा लक्ष्मी चैनी आणि सचिव बबिता अत्रे यांनी या प्रकल्पाच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले. समाजासाठी कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करून स्त्रीशक्तीला प्रेरणा देणारा हा सोहळा उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला.
















Leave a Reply