टिटवाळा : अजय शेलार
स्त्रीशक्तीच्या कर्तृत्वाचा गौरव करत समाजात जागरूकतेचा संदेश देण्यासाठी कल्याण तालुका पोलीस स्टेशन टिटवाळा येथे जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. महिला व बाल विकास विभाग आणि महिला विकास केंद्र संस्थेच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रमात महिला सक्षमीकरण, आरोग्य, कायदेविषयक मार्गदर्शन आणि सांस्कृतिक सादरीकरणांचा संगम पाहायला मिळाला.
स्त्रीशक्तीचा सन्मान आणि सामाजिक जनजागृतीचा संदेश देणारा जागतिक महिला दिन कल्याण तालुका पोलीस स्टेशन, मांडा-टिटवाळा (पश्चिम) येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य आणि महिला विकास केंद्र संस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या समुपदेशन केंद्र तसेच पोलीस महिला दक्षता समितीच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरबाड उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड होते. कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून पोलीस निरीक्षक पंकज गिरी उपस्थित होते, तर सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला काळे आणि पोलीस उपनिरीक्षक पूजा काळे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमात विविध सामाजिक संस्थांच्या महिला सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. वृक्षदीप वात्सल्य सामाजिक संस्था, स्वराज्य रणरागिनी महिला संस्था, कर्तव्य महिला विकास मंडळ, नारीशक्ती संस्था, श्रमजीवी संघटना, समृद्धी वस्तीतरीय संघ टिटवाळा तसेच झेप स्वयं सहायता बचत गट, बदलापूर आदी संस्थांच्या सदस्यांसह परिसरातील बचत गटातील महिला व सामाजिक कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आणि पहिली मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख या महान क्रांतिकारी स्त्रीपुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. सुप्रिया आचरेकर व त्यांच्या संचाने सादर केलेल्या स्वागतगीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
अध्यक्षीय भाषणात उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड यांनी महिलांचे समाजातील तसेच पोलीस दलातील महत्त्व अधोरेखित करत महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येऊन समाजघडणीत सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन केले. पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनीही महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत त्यांच्या हक्कांबाबत जागरूक राहण्याचे मार्गदर्शन केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला काळे यांनीही महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध सरकारी योजनांची माहिती देत प्रेरणादायी विचार मांडले.
कार्यक्रमादरम्यान अधिवक्ता नंदा जगताप यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. त्यांनी उपस्थित महिलांना विविध कायद्यांविषयी माहिती देत महिलांनी अन्यायाविरोधात ठामपणे उभे राहण्याचा संदेश दिला. यावेळी लक्ष्मी अहिरे यांनी महिला दिनानिमित्त प्रभावी कविता सादर करून महिलांना प्रेरणा दिली. महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. जागृती पाटील यांनी विशेष मार्गदर्शन केले.
याशिवाय नीता पाठक, शिला नवाळे आणि तृप्ती गायकवाड यांनीही महिलांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कुमारी प्रचिती भोसले आणि कुमारी अक्षया भोईर यांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराने कार्यक्रमात रंगत आणली. या कार्यक्रमातून आरोग्य, शिक्षण आणि संस्कृतीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
पोलीस मदन शेलवले, पोलीस भगत, समुपदेशक स्वप्निल वहाणे, समुपदेशक अनिता म्हात्रे आणि रोशन विशे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाचे मार्गदर्शन, रूपरेषा व सूत्रसंचालन समुपदेशिका हिराताई कांबळे यांनी केले. तृप्ती गायकवाड, शिला नवाळे, वंदना बकुळे, रजना भामरे, शायदा शेख, मीना आदी सदस्यांसह विविध संस्थांच्या महिला सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांना अल्पोपहार देण्यात आला. या उपक्रमामुळे पोलीस दलातील महिला कर्मचारी आणि परिसरातील महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करत कार्यक्रमाची उत्साहपूर्ण सांगता करण्यात आली.

















Leave a Reply