कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण पश्चिम येथील बिर्ला कॉलेज परिसरात सार्वजनिक रस्त्यावर पेट्रोल टाकून आग लावण्याचा धक्कादायक प्रकार घडत असल्याची तक्रार महात्मा फुले पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या जीवितासह मालमत्तेलाही गंभीर धोका निर्माण झाल्याची बाब समोर आली आहे. पर्यावरण व पर्यटन संरक्षण बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोविंद प्रजापती यांनी यासंदर्भात लेखी निवेदन देत संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.तक्रारीनुसार, बिर्ला कॉलेजसमोरील “मी मी हॉटेल” आणि “मिया कबाब हॉटेल” यांच्या मागील बाजूस काही व्यक्ती रात्रीच्या सुमारास, विशेषतः पहाटे सुमारे दोन वाजण्याच्या दरम्यान, हॉटेलच्या चिमणीतील काही भाग काढून त्या ठिकाणी पेट्रोल टाकून आग लावत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार सार्वजनिक रस्त्यावर घडत असल्यामुळे परिसरात ये-जा करणाऱ्या नागरिकांसह पार्क केलेली दुचाकी व चारचाकी वाहने तसेच आसपासच्या मालमत्तेला मोठा धोका निर्माण होत असल्याची तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.आग लावण्याच्या या प्रकारामुळे परिसरात धूर आणि प्रदूषणाचे प्रमाण वाढत असून नागरिकांच्या आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे संबंधित हॉटेलांकडे आवश्यक शासकीय परवानग्या नसल्याचा आरोप करण्यात आला असून अग्निसुरक्षेसाठी आवश्यक असलेले फायर लायसन्ससारखे मूलभूत परवानेही उपलब्ध नसल्याचे तक्रारदारांनी नमूद केले आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ नियमभंग नसून सार्वजनिक सुरक्षेला थेट धोका निर्माण करणारा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.यासंदर्भात तातडीने चौकशी करून गुन्हा दाखल करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी पोलिसांनी तातडीने तपास सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, कल्याण खडकपाडा येथील साई चौक परिसरात नुकत्याच लागलेल्या आगीत दोन दुकानांचे मोठे नुकसान झाले असल्याची घटना ताजी असताना अशा प्रकारांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचेही तक्रारदारांनी नमूद केले आहे. परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
रस्त्यावर पेट्रोल टाकून आग लावण्याचा प्रकार; कल्याणमध्ये गंभीर प्रकाराबाबत कारवाईची मागणी














Leave a Reply