लोक अदालतीत ६५२७ प्रलंबित प्रकरणांचा निपटारा होणार

शनिवारी कल्याण न्यायालयात आयोजन; मालमत्ता करदात्यांना सहभागी होण्याचे आवाहन

कल्याण : प्रतिनिधी

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दि. १४ मार्च २०२६ रोजी कल्याण येथील अति. जिल्हा व सत्र न्यायालयात ‘राष्ट्रीय लोक न्यायालय’ आयोजित करण्यात येणार आहे. या लोक अदालतीमध्ये प्रलंबित असलेल्या एकूण ६५२७ प्रकरणांचा निपटारा करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागामार्फत देण्यात आली आहे.

या लोक अदालतीत प्रलंबित असलेल्या प्री-लिटिगेशन स्वरूपातील प्रकरणांसाठी न्यायालयाच्या सही-शिक्क्यासह नोटिसा तयार करण्यात आल्या असून त्या संबंधित प्रभागांमार्फत नागरिकांना वितरित करण्याचे काम सुरू आहे. या माध्यमातून मालमत्ता करासंदर्भातील प्रलंबित प्रकरणांचा तडजोडीच्या मार्गाने निपटारा करण्यावर भर दिला जाणार आहे.

लोक अदालतीसाठी न्यायालय परिसरात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यामध्ये मंडप उभारणीसह अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी टेबल, खुर्च्या, पंखे, संगणकीय व्यवस्था तसेच पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लक्षात घेऊन अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि आवश्यकतेनुसार पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मालमत्ता कराशी संबंधित प्रलंबित प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या या लोक अदालतीचा लाभ सर्व करदात्यांनी घ्यावा तसेच महानगरपालिकेस सहकार्य करून विकासकामांना हातभार लावावा, असे आवाहन उप आयुक्त (कर) बाळासाहेब चव्हाण यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *