हॉटेल व्यावसायिक ‘गॅस’च्या टंचाईत; वितरणात अडथळे, व्यवसायावर परिणाम

मुंबई डेटलाईन 24 टीम  :

इराण–अमेरिका युद्धजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम होत असून त्याचा फटका ठाणे जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांना बसत आहे. गॅस सिलिंडरचा पुरवठा मर्यादित झाल्याने वितरणात अडथळे निर्माण झाले असून अनेक हॉटेल व्यावसायिकांना व्यवसाय चालवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सध्या जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याची तक्रार व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. पूर्वी नियमितपणे उपलब्ध होणारे सिलिंडर आता उशिराने मिळत असल्याने हॉटेल व्यवसायावर त्याचा थेट परिणाम होत आहे. गॅसचा साठा कमी झाल्याने काही हॉटेल चालकांना कामकाज मर्यादित ठेवावे लागत असून भविष्यात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा कमी झाल्याने अनेक हॉटेल चालकांना चार ते पाच दिवस आधीच सिलिंडरची मागणी नोंदवावी लागत आहे. पुरवठा उशिरा होत असल्याने हॉटेल व्यवसायाच्या नियोजनावरही परिणाम होत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातील रुण व चेउर परिसरात गॅस रिफिलिंग स्टेशन कार्यरत असून त्याठिकाणी गॅस वितरणाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. गॅस पुरवठ्यातील अडचणी तात्पुरत्या असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हॉटेल व्यावसायिकांच्या मते, सध्याच्या घडीला व्यवसायावर फारसा परिणाम जाणवत नसला तरी पुढील तीन ते चार दिवसांत परिस्थिती बदलल्यास हॉटेल व्यवसायावर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी हॉटेल व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *