केडीएमसीत…खळबळ…!

नगररचना विभागात बेकायदेशीर नियुक्त्या; ११० फाईल्सना मंजुरी दिल्याचा आरोप

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नगररचना विभागात बेकायदेशीर नियुक्त्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, नियमबाह्य पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी तब्बल ११० फाईल्सना मंजुरी दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

नगररचना विभागात फाईल चोरीच्या प्रकरणांची चर्चा सुरू असतानाच आता बेकायदेशीर नियुक्त्यांचा मुद्दा पुढे आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. अस्तित्वात नसलेल्या पदांची निर्मिती करून त्यावर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शासनाची मंजुरी किंवा स्वीकृत आकृतीबंध नसताना “टाऊन प्लॅनिंग डेव्हलपमेंट ऑफिसर” आणि “डेप्युटी इंजिनिअर” अशी पदे निर्माण करण्यात आली. दीड वर्षापूर्वी तत्कालीन आयुक्त आणि नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनी ही पदे तयार केल्याचे सांगितले जात आहे. या पदांवर महापालिकेत कार्यरत असलेल्या सुरेंद्र टेंगळे यांची ‘टाऊन प्लॅनिंग डेव्हलपमेंट ऑफिसर’ म्हणून, तर दीपक मोरे आणि सुहास पवार यांची ‘डेप्युटी इंजिनिअर’ म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे समोर आले आहे.

ऑगस्ट २०२५ मध्ये सहाय्यक संचालक संतोष डोईफोडे यांनी आदेश जारी करून या नियुक्त्या केल्याची माहितीही समोर आली आहे. या अधिकाऱ्यांनी नगररचना विभागातील तब्बल ११० फाईल्सना मंजुरी दिल्याचा आरोप करण्यात येत आहे.

दरम्यान, विधानसभेत या मुद्द्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की शासनाने अशा कोणत्याही पदांना मंजुरी दिलेली नाही आणि अधिकृतपणे अशी पदनिर्मिती करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही.

या पार्श्वभूमीवर आमदार शशिकांत शिंदे यांनी महापालिकेवर गंभीर आरोप करत, शासनाची परवानगी न घेता पदनिर्मिती करून त्या अधिकाऱ्यांनी नगररचना विभागातील ११० फाईल्सना मंजुरी दिल्याचा दावा केला. या प्रकरणात अनियमितता झाली आहे का, तसेच याची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल का, असा सवालही त्यांनी सभागृहात उपस्थित केला. या प्रकरणामुळे केडीएमसी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढे या प्रकरणाची चौकशी होऊन नेमकी काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *