कल्याण : मासिक पाळीच्या काळात महिलांच्या आरोग्य आणि स्वच्छतेचा प्रश्न गंभीर होत चालल्याच्या पार्श्वभूमीवर गरीब, आदिवासी व कातकरी समाजातील महिलांना मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्याची मागणी पुढे येत आहे. या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली १६ मार्च रोजी ठाणे व पालघर जिल्ह्यातील विविध तहसीलदार कार्यालयांवर मोर्चा काढण्यात आला. रेशन दुकाने आणि अंगणवाडी केंद्रांमार्फत महिलांना दरमहा मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी जोरदारपणे करण्यात आली.
ग्रामीण आणि आदिवासी भागातील अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण असल्याने महिलांना मासिक पाळीच्या काळात आवश्यक असलेले सॅनिटरी नॅपकिन विकत घेणे परवडत नाही. परिणामी अनेक महिला अजूनही अस्वच्छ कापड किंवा इतर अपुरे पर्याय वापरण्यास भाग पडतात. यामुळे त्वचारोग, संसर्गजन्य आजार तसेच गर्भाशयाशी संबंधित विविध आजारांचा धोका वाढत असल्याचे तज्ज्ञांनीही वारंवार अधोरेखित केले आहे.
या पार्श्वभूमीवर महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासनाने ठोस पावले उचलणे आवश्यक असल्याचे श्रमजीवी संघटनेने सांगितले. गरीब आणि आदिवासी महिलांना सॅनिटरी पॅड सहज आणि मोफत उपलब्ध झाल्यास त्यांच्या आरोग्याचे संरक्षण होईल तसेच स्वच्छतेबाबत जागरूकताही वाढेल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला.
दरम्यान, श्रमजीवी संघटनेच्या माजी कार्याध्यक्षा आणि वसई विधानसभा मतदारसंघाच्या सदस्य स्नेहा दुबे पंडित यांनी यापूर्वीच विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला होता. राज्याच्या अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान त्यांनी गरीब व आदिवासी महिलांसाठी मोफत सॅनिटरी पॅड योजना सुरू करण्याची मागणी केली होती. तसेच महिलांच्या आरोग्याच्या प्रश्नावर शासनाने गांभीर्याने विचार करून तातडीने धोरणात्मक निर्णय घ्यावा, असे त्यांनी नमूद केले होते.
मोर्चादरम्यान महिलांनी तहसीलदारांमार्फत राज्य सरकारकडे निवेदन सादर केले. या निवेदनात रेशन दुकाने तसेच अंगणवाडी केंद्रांमार्फत गरीब, आदिवासी आणि कातकरी समाजातील महिलांना दरमहा किमान १२ सॅनिटरी पॅड मोफत देण्याची योजना तातडीने सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली.
महिलांच्या आरोग्य, स्वच्छता आणि सन्मानाशी संबंधित या प्रश्नासाठी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात मोठ्या संख्येने महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शासनाने या मागण्यांची दखल घेऊन लवकरच ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.














Leave a Reply