केडीएमसीतील भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणात मोठा भ्रष्टाचार? कंत्राटदार संस्थेच्या चौकशीची मागणी

Iडोंबिवली (शंकर जाधव) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाच्या कामात झालेल्या कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित झाला असून, यामुळे महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची ठाम मागणी करत गंभीर आरोप मांडले.

नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी सभेत सांगितले की, भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटदार संस्थेकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित संस्थेशी निगडित एका डॉक्टरने महापालिका आणि संबंधित संस्था या दोन्हींकडून एकाचवेळी पगार घेतल्याचा आरोप त्यांनी केला. हा प्रकार प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घडल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

याशिवाय, संबंधित कंत्राटदार संस्थेला अधिकृत मुदतवाढ दिलेली नसतानाही तब्बल तीन महिन्यांपर्यंत काम दिले गेल्याचेही म्हात्रे यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, यामागील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

या गंभीर आरोपांची दखल घेत महापौर हर्षाली चौधरी यांनी तातडीने पालिका आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले. आयुक्तांनी देखील या प्रकरणाची चौकशी करण्याचे मान्य केले असून, लवकरच याबाबत अहवाल सादर केला जाणार असल्याचे संकेत आहेत.

दरम्यान, शहरात वाढलेल्या भटक्या कुत्र्यांच्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः दुचाकीस्वारांच्या मागे कुत्र्यांचे टोळके धाव घेत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे, तर पादचारी नागरिकांनाही रस्त्यावरून चालताना भीती वाटत आहे. त्यामुळे या समस्येवर तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. महापालिकेच्या निर्बीजीकरणाच्या कामकाजात पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी ही चौकशी कितपत निर्णायक ठरते, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *