रौप्य महोत्सवी वर्षात श्री साई गणेश मंडळाची भव्य पदयात्रा; मांडा-टिटवाळ्यातून साई पालखीचे शिर्डीकडे प्रस्थान, भक्तिभावाचा महासागर उसळला

टिटवाळा : अजय शेलार 

मांडा-टिटवाळा येथील श्री साई गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येणाऱ्या पदयात्रा व पालखी सोहळ्याला यंदा गुढीपाडवा आणि रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य लाभल्याने विशेष उत्साह आणि भक्तिभावाचे वातावरण पाहायला मिळाले. मंडळाच्या स्थापनेची २५ वर्षे पूर्ण होत असल्याने यंदाची पदयात्रा अधिक भव्य, दिव्य आणि संस्मरणीय ठरली. गुरुवार, दि. १९ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता मांडा-टिटवाळा येथून साई पालखीचे शिर्डीकडे विधिवत प्रस्थान झाले.

“मांडा-टिटवाळा ते शिर्डी” या पारंपरिक मार्गावर निघालेल्या या पदयात्रेत साईभक्त, भाविक आणि समाजातील विविध घटकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत साईनामाचा गजर करत वातावरण भक्तिमय केले. ढोल-ताशांच्या गजरात, टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि “साई राम” च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. साईभक्तांच्या उत्साहामुळे संपूर्ण पदयात्रा एक आध्यात्मिक सोहळा ठरली.

मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त या पदयात्रेला विशेष स्वरूप देण्यात आले असून, विविध सामाजिक उपक्रम, सेवा कार्य आणि भक्तांसाठी सोयी-सुविधांचीही विशेष काळजी घेण्यात आली. या यात्रेमुळे केवळ धार्मिक भावना नव्हे, तर सामाजिक एकोप्याचा संदेशही दृढ झाला असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या पदयात्रेनंतर भाविकांसाठी साई भंडारा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. २९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून अजिंक्य, शिवसेना शाखा, सावरकर नगर, मांडा-टिटवाळा (पूर्व) येथे हा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे. या प्रसंगी सर्व साईभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष किशोर शुक्ला यांनी केले आहे. तर सलग २५ वर्ष या साई पालखीला मिळत असलेला प्रतिसाद हा नक्कीच गौरवशाली आहे . हा वारसा असाच पुढे जपला जावा आणि समृध्तेने चालत रहावा अश्या सदिच्छा यावेळी शुक्ला यांनी व्यक्त केल्या .

या यशस्वी आयोजनासाठी सर्व साईभक्त, देणगीदार आणि कार्यकर्त्यांचे मंडळाकडून मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत. रौप्य महोत्सवी वर्षात पार पडणारी ही पदयात्रा साईभक्तांच्या श्रद्धा, समर्पण आणि एकतेचे प्रतीक ठरत असून, टिटवाळा परिसरात या सोहळ्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *