समृद्धी महामार्गावर गंभीर अनियमितता; निंबवली टोल प्लाझावर बेकायदेशीर टोलमाफी ?

व्यवस्थापन गायब, वकिलांकडून अधिकृत तक्रार दाखल

टिटवाळा : अजय शेलार 

राज्यातील महत्त्वाच्या समृद्धी महामार्गावर कल्याण तालुक्यात असलेल्या निंबवली टोल प्लाझावर गंभीर अनियमितता उघडकीस आली असून, टोल वसुलीत मनमानी, अधिकाऱ्यांची अनुपस्थिती आणि प्रवाशांशी उद्धट वर्तन यामुळे हा मुद्दा अधिकच चिघळला आहे. या प्रकरणी आता कायदेशीर पातळीवर हालचालींना वेग आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका प्रवाशाने केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, महामार्गावर प्रवेश करताना त्याच्या पुढील एका खाजगी वाहनाने ड्रायव्हर साइडने डेबिट कार्डसारखा दिसणारा आयडी दाखविला. त्या आधारे टोल कर्मचाऱ्याने कोणताही शुल्क न आकारता संबंधित वाहनाला मार्ग मोकळा करून दिला. अधिकृत टोलमाफी नसतानाही अशा प्रकारे वाहनांना सोडले जात असल्याने गैरप्रकाराचा संशय व्यक्त केला जात आहे.

या घटनेबाबत विचारणा केल्यावर संबंधित कर्मचाऱ्याने सुरुवातीला “पोलिस होते” असे सांगितले. मात्र पुढील प्रश्न विचारल्यावर “कमिशनर होते” असे उद्धटपणे उत्तर देत प्रवाशाशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे टोल व्यवस्थापनातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तर या महामार्गावरच्या टोलनाक्यावरून दुचाकीस्वार देखील सरार्सपणे बिनदिक्कत रहदारी करत असल्याची बाब देखील उघड झाली आहे .

दरम्यान, यावेळी मॅनेजर अनुपस्थित असल्याचेही समोर आले आहे. कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केले असता “सुट्टीवर आहेत” असे सांगून तक्रारी टाळल्या जात आहेत, तसेच “सोमवारी या” असे सांगून प्रवाशांना परत पाठवले जात आहे. विशेष म्हणजे, मॅनेजरच्या अनुपस्थितीत कोणत्याही अधिकाऱ्याला जबाबदारी देण्यात आलेली नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे संपूर्ण टोल प्लाझा कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याविना चालत असल्याची धक्कादायक स्थिती आहे.

या टोल प्लाझाचा ठेका अश्मी रोड करिअर या कंपनीकडे असूनही नियंत्रणातील शिथिलता स्पष्टपणे जाणवत आहे. त्यामुळे भविष्यात एखादी अनुचित घटना घडल्यास जबाबदारी नेमकी कोणाची, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

या प्रकरणाची दखल घेत ॲड. अविनाश शिळकंदे , दिलीप राठोड (विशेष कार्यकारी अधिकारी) आणि ॲड. महेश गायकवाड यांनी अधिकृत तक्रार अर्ज दाखल केला आहे. संबंधित प्रकाराची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रकल्प संचालक, ,समृद्धी महामार्ग प्राधिकरण अधिकारी, टोल व्यवस्थापन, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांना दिलेल्या एका पत्राद्वारे केली आहे.

तसेच, टोल वसुलीत पारदर्शकता आणणे, बेकायदेशीर टोलमाफी तात्काळ थांबवणे, टोल प्लाझावर २४x७ जबाबदार अधिकारी नियुक्त करणे आणि प्रवाशांशी होणारे गैरवर्तन रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

राज्यातील प्रतिष्ठेचा समृद्धी महामार्ग प्रकल्प असताना अशा प्रकारच्या अनियमितता समोर येणे ही गंभीर बाब मानली जात असून, याप्रकरणी प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबबात निंबवली टोल नाक्यावरील व्यवस्थापक समीर शेख यांच्याशी बोलणे केले असता आपण त्या दिवशी ईद निमित्त सुट्टीवर होतो . सदर सोडण्यात आलेली गाडी टिटवाळा पोलिस स्टेनचे एक एपीआय होते . त्यामुळे सोडण्यात आली असे त्यांनी सांगितले तर कर्मचारी यांनी जे उद्धट वर्तन केले त्याबाबत आपण त्याला वार्निंग लेटर पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *