एकविरा देवी जत्रेनिमित्त टोलमाफीची मागणी; लाखो भाविकांना दिलासा देण्याचे आवाहन

आगरी-कोळी समाजासह विविध भागांतून मोठी गर्दी अपेक्षित; शासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

टिटवाळा : पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील एकविरा देवी मंदिर येथे दिनांक २५ व २६ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या वार्षिक जत्रा व धार्मिक उत्सवानिमित्त संबंधित मार्गांवरील टोलमाफी जाहीर करण्याची मागणी पुढे आली असून टिटवाळा येथील सामाजिक कार्यकर्ते आणि एकविरा भक्तअसलेले विजयभाऊ देशेकर यांनी मुख्यमंत्री यांना याबाबत केलेल्या पत्रव्यवहारात ही मागणी केली आहे . आगरी-कोळी समाजासह राज्याच्या विविध भागांतून लाखो भाविक या कालावधीत दर्शनासाठी येणार असल्याने सामान्य भक्तांवर पडणारा आर्थिक भार कमी करण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही एकविरा देवीच्या जत्रेला मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे. रायगड, ठाणे, पालघर, मुंबई उपनगर आदी विविध गांतून अनेक कुटुंबे स्वतःच्या वाहनांनी मंदिराकडे प्रस्थान करतात. नवसपूर्तीसाठीही या दोन दिवसांत विशेष गर्दी होत असल्याने संबंधित महामार्गांवरील टोल नाक्यांवर वाहनांची संख्या लक्षणीय वाढते.

यामुळे प्रवास खर्चात वाढ होत असून सामान्य भक्तांनावर आर्थिक भार पडतो . शासन विविध सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी टोलमाफीसारखे निर्णय घेत असते. त्याच धर्तीवर एकविरा देवी जत्रेनिमित्तही टोलमाफी लागू करण्याची मागणी भक्तांकडून करण्यात आली आहे.

या संदर्भात टिटवाळा येथील एकविरा आई भक्त देशेकर यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे लेखी निवेदन सादर केले आहे. त्यांनी शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

दरम्यान, जत्रेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाकडून वाहतूक व सुरक्षा व्यवस्थेची तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. टोलमाफीचा निर्णय झाल्यास भाविकांची गैरसोय कमी होऊन उत्सव अधिक सुलभपणे पार पडण्यास मदत होईल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *