एकविरा देवी यात्रेत वाढत्या चोरीच्या घटनांमुळे भाविकांनी दागिने टाळावेत…कोळी महासंघाचे आवाहन

भाविकांनी दागिने टाळावेत; देवस्थान परिसरात कडक सुरक्षा व्यवस्थेची मागणी

कल्याण : स्वप्नील शिंदे
चैत्र महिन्यात भरविण्यात येणाऱ्या एकविरा देवीच्या यात्रेला ठाणे व रायगड जिल्ह्यातील कोळी-आगरी समाजातील भाविक मोठ्या भक्तिभावाने उपस्थित राहतात. कार्ला येथील एकविरा देवी मंदिर तसेच विविध गावांमध्ये निघणाऱ्या पालखी यात्रांमुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण होते. भैरव देवाच्या यात्रेपासून सुरू होणारी ही परंपरा समाजाच्या श्रद्धा, संस्कृती आणि एकोप्याचे प्रतीक मानली जाते.

दरम्यान, कोळी महासंघाच्या वतीने यात्रेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे. समुद्रात कठोर परिश्रम करून उदरनिर्वाह करणारे अनेक कोळी बांधव महिनोनमहिने कुटुंबापासून दूर राहून कष्टाने कमावलेल्या उत्पन्नातून आपल्या कुटुंबासाठी दागिने खरेदी करतात. सण-उत्सव, यात्रा आणि लग्नसमारंभात हे दागिने परिधान करण्याची परंपरा समाजात रूढ आहे.

मात्र, अलीकडच्या काळात एकविरा देवी मंदिर परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. यात्रेतील प्रचंड गर्दीचा फायदा घेत दागिने चोरीचे प्रकार वाढत असून, भाविकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अटाळी, कल्याण येथील भाविकाचे  दागिने चोरीला गेल्याची घटना ताजी असताना, संबंधित प्रकरणात पोलीस प्रशासनाकडून समाधानकारक कारवाई न झाल्याची नाराजीही समाजातून व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर कोळी महासंघाने सर्व भाविक, विशेषतः महिला बांधवांना नम्र आवाहन केले आहे की, यात्रेदरम्यान शक्यतो सोने-चांदीचे दागिने परिधान करणे टाळावे. वाढती महागाई आणि मेहनतीने कमावलेली संपत्ती लक्षात घेता स्वतःची व कुटुंबाची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची असल्याचे महासंघाने स्पष्ट केले आहे. याबाबत नुकतेच प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवानंद भोईर -कोळी महासंघ उपनेते यांनी सर्व भाविक भक्तांना हे आवाहन केले आहे .

तसेच, देवस्थान प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना मंदिर परिसरात अधिक कडक सुरक्षा व्यवस्था उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, पोलिसांचा बंदोबस्त वाढवणे आणि गर्दीच्या ठिकाणी विशेष लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे भविष्यात अशा अनुचित घटनांवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

व्हिडीओ बातमी पहा : https://youtube.com/shorts/E7VX2Pk10Vo?si=QQYk6X5Uq4ZQfY2W

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *