डोंबिवली, दि. २५ (प्रतिनिधी – शंकर जाधव) : डोंबिवली पूर्वेकडील मिलापनगर परिसरात मंगळवारी गॅस सिलेंडरच्या टंचाईने गंभीर रूप धारण केले असून नागरिकांना अक्षरशः रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागत आहे. बुकिंग करूनही वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याने संतप्त नागरिकांनी एजन्सीबाहेर लांबच लांब रांगा लावल्या आहेत. कडक उन्हात तासन्तास उभे राहून सिलेंडर मिळवण्यासाठी सुरू असलेली ही धडपड प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.
परिसरातील अनेक नागरिकांनी आपल्या घरातील रिकामे सिलेंडर घेऊन थेट एजन्सीकडे धाव घेतली आहे. कुणी दुचाकीवरून, तर कुणी रिक्षामधून सिलेंडर आणताना दिसत आहे. महिलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच जण या त्रासाला सामोरे जात आहेत. विशेष म्हणजे, एक वयोवृद्ध आजीही सिलेंडर मिळवण्यासाठी रांगेत उभी असल्याचे दृश्य पाहून उपस्थितांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या समस्येमुळे घरगुती स्वयंपाकाची मोठी अडचण निर्माण झाली आहे. अनेकांनी वेळेवर बुकिंग करूनही वितरणात होत असलेल्या विलंबामुळे संताप व्यक्त केला आहे. “बुकिंग केल्यावरही सिलेंडर मिळत नसेल, तर सामान्य माणसाने करायचे काय?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सरकारकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली असून गॅस वितरण व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी विनंती केली आहे. अन्यथा ही समस्या आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. डोंबिवलीतील ही परिस्थिती केवळ एका भागापुरती मर्यादित नसून, शहरातील इतर भागांमध्येही अशाच तक्रारी येत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन नागरिकांना दिलासा देणे अत्यावश्यक ठरले आहे.














Leave a Reply