निरंकारी रक्तदान शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

२९५ युनिट रक्त संकलन
कल्याण : रक्तदान शिबिरांची श्रृंखला कायम ठेवत संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने मानवीयतेच्या भावनेतून रविवारी घणसोली, नवी मुंबई आणि वसई (पश्चिम) येथे भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले व त्यामध्ये एकूण २९५ युनिट रक्त जमा करण्यात आले. दोन्ही रक्तदान शिबिरांमध्ये संत निरंकारी रक्तपेढीने रक्त संकलनाचे कार्य केले.
संत निरंकारी मंडळाच्या घणसोली शाखेच्या वतीने न्यू बॉम्बे सिटी स्कूल, सेक्टर-९, घरोंदा, घणसोली, नवी मुंबई येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिरात सुमारे १७७ इच्छुकांनी रजिस्ट्रेशन केले व त्यापैकी १५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. उल्लेखनीय आहे, की मानवीयतेच्या भावनेतून आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरामध्ये निरंकारी भक्तगणांसह स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
या शिबिराचा शुभारंभ निरंकार प्रभूच्या नामस्मरणाद्वारे मंडळाचे सेक्टर संयोजक मनोहर सावंत यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या प्रसंगी स्थानिक मुखी सदानंद हरिश्चंद्र पाटील व सेवादल क्षेत्रीय संचालक  अशोक केरेकर यांच्यासह स्थानिक सेवादल अधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमास प्रामुख्याने नगरसेविका अंजना दिलीप म्हात्रे, नगरसेवक  गणेश सकपाळ, नगरसेविका ललिता मडवी, घणसोली ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष ह. भ. प. बाबुराव पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी संत निरंकारी मिशनच्या मानवतावादी कार्याचे कौतुक केले.
याच दिवशी संत निरंकारी मंडळाच्या वसई शाखेच्या वतीने वर्तक स्कूल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये १४५ निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. या शिबिराचा शुभारंभ स्थानिक नागरीक  नामदेव माळी, शिक्षक यांच्या उपस्थितीत निरंकार प्रभुकडे प्रार्थना करुन करण्यात आले. या प्रसंगी वर्तक शाळेचे सुपरवायझर  उदयसिंग राठोड यांच्यासह संत निरंकारी मंडळाचे स्थानिक प्रबंध व सेवादल अधिकारी उपस्थित होते.
वसई शाखेचे मुखी  गुलाब खैरवार यांच्या देखरेखीखाली स्थानिक सेवादल युनिट व एसएनसीएफच्या स्वयंसेवकांच्या सहयोगाने या शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *