ई-गव्हर्नन्स व सेवाकर्मी प्लस मध्ये एमपीसीबीचा झेंडा; प्रमोद नांदगावकरांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक

टिटवाळा : राज्य शासनाच्या प्रशासनातील गुणवत्ता, पारदर्शकता आणि सेवा कार्यातील उत्कृष्टतेला अधोरेखित करणाऱ्या ‘१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा’ तसेच ‘सेवाकर्मी प्लस’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या उपक्रमात ई-गव्हर्नन्स सुधारणा विभागात मंडळाने पाचवा क्रमांक पटकावला, तर सेवाकर्मी प्लस कार्यक्रमात प्रथम क्रमांक मिळवत राज्यात अव्वल स्थान मिळवले.

या यशाबद्दल आयोजित विशेष कार्यक्रमात मंडळाचे प्रभारी सदस्य सचिव अभय पिंपरकर आणि प्रशासकीय अधिकारी प्रमोद नांदगावकर यांनी प्रशस्तिपत्र स्वीकारले. माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला.

प्रमोद नांदगावकर हे टिटवाळा येथील रहिवासी असून सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. ‘रेड स्वस्तिक’च्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात विविध सेवा उपक्रम राबवले असून अनेक सामाजिक संस्थांमधूनही त्यांचा सक्रिय सहभाग दिसून येतो. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या स्वच्छता अभियानात त्यांनी ‘स्वच्छता दूत’ म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळत नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत व्यापक जनजागृती केली.

याचबरोबर, टिटवाळा परिसरातील नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळावे यासाठी ‘गंधर्व ग्रुप’च्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्षांपासून सातत्याने प्रयत्न केले आहेत. स्थानिक कलाकारांना संधी उपलब्ध करून देत सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

प्रशासकीय सेवेत उत्कृष्ट कामगिरी करतानाच सामाजिक क्षेत्रातही सक्रिय भूमिका निभावणाऱ्या प्रमोद नांदगावकर यांच्या या यशामुळे सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत असून, टिटवाळा परिसरासाठी हा अभिमानाचा क्षण ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *