डोंबिवलीत संतापाची लाट; पुजाऱ्याकडून चिमुरडीवर अत्याचार
कल्याण-डोंबिवली शहर पुन्हा एकदा संतापजनक घटनेने हादरले आहे. डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी परिसरात शेजारी राहणाऱ्या एका पुजाऱ्याने अवघ्या पाच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी आरोपी हरीष भावे याला अटक केली असून संपूर्ण परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे शहरातील लहान मुलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
ओळखीचा गैरफायदा; विश्वासघाताची परिसीमा
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हरीष भावे हा घरोघरी जाऊन पूजा-अर्चा करणारा पुजारी असून तो पीडित कुटुंबाच्या शेजारी राहत होता. घरातील ओळख आणि विश्वास याचा गैरफायदा घेत, आई-वडील घराबाहेर असताना आरोपीने हा अमानुष प्रकार केल्याचे समोर आले आहे. धार्मिक कार्य करणाऱ्या व्यक्तीकडूनच असा प्रकार घडल्याने समाजमनात तीव्र संताप आणि निराशा व्यक्त होत आहे.
चिमुरडीच्या धाडसामुळे गुन्हा उघड
घडलेला प्रकार पीडित चिमुरडीने धाडसाने आपल्या पालकांना सांगितल्यानंतर या प्रकरणाचा भंडाफोड झाला. घटनेची माहिती मिळताच पालकांनी तात्काळ टिळकनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत त्वरित गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली.
नागरिकांमध्ये भीती आणि संताप
गेल्या काही दिवसांत परिसरात घडलेल्या गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर ही घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. “डोंबिवलीत नेमकं चाललंय काय?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विशेषतः मुलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
कठोर कारवाईची मागणी
या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी पुढे येत आहे.














Leave a Reply