डिलाईल रोड व विलेपार्ले येथे 329 निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान

कल्याण : “मानवसेवा हीच ईश्वराची खरी भक्ति होय.” निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांची ही दिव्य शिकवण जीवनात धारण करुन रविवारी  मुंबईत डिलाईल रोड व विलेपार्ले येथे संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने आयोजित दोन रक्तदान शिबिरांमध्ये एकंदर 329 निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्त भावनेने रक्तदान केले.

तालचेकर वाडी म्युनिसिपल स्कूल, लोअर परेल येथे आयोजित रक्तदान शिबिरामध्ये संत निरंकारी मिशनच्या डिलाईल रोड व लोअर परेल येथील दोन शाखांमधील रक्तदात्यांनी उस्फूर्तपणे भाग घेतला आणि 185 युनिट रक्तदान केले. रक्त संकलनाची सेवा संत निरंकारी रक्तपेढी व नायर हॉस्पिटलची रक्तपेढी यांच्यामार्फत करण्‍यात आली. या शिबिराचा शुभारंभ मिशनचे स्थानिक सेक्टर संयोजक गोपिनाथ बामुगडे व दादर सेक्टरच्या संयोजक पूजा चुघ यांच्या उपस्थितित निरंकार प्रभुच्या नामस्मरणाने करण्यात आले. या प्रसंगी मुंबई क्षेत्र 4 चे सेवादल अधिकारी, मुखी, प्रबंधक तसेच नायर हॉस्पिटलचे डॉक्टर्स आदि उपस्थित होते. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी या शिबिराला सदिच्छा भेट दिली आणि संत निरंकारी मिशनकडून निष्काम भावनेने केल्या जाणाऱ्या मानवसेवांचे प्रशंसा केली.

संत निरंकारी सत्संग भवन, विलेपार्ले येथे आयोजित रक्तदान शिबिरात  144 निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले. याच भवनामध्ये स्थित असलेल्या संत निरंकारी रक्तपेढीने या शिबिरामध्ये रक्त संकलन केले.  या शिबिराचा शुभारंभ स्थानिक सेवादल युनिटचे शिक्षक प्रकाश गोसावी यांच्या उपस्थितीमध्ये निरंकार प्रभुचे ध्यान व सतगुरुच्या जयघोषा द्वारे करण्यात आले. या प्रसंगी स्थानिक सेक्टर संयोजक जयप्रकाश उपाध्याय, प्रबंधक, सेवादल अधिकारी व रक्तपेढीचे डॉक्टर्स, व्यवस्थापक आदि उपस्थित होते.

या शिबिराच्या एक दिवस अगोदर शनिवारी सकाळी मिशनच्या विलेपार्ले शाखेमार्फत संत निरंकारी सत्संग भवन, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, ऑफ हनुमान रोड येथून विलेपार्ले पूर्व आणि परत भवन पर्यंत रक्तदानाच्या प्रति जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये शेकडोंच्या संख्येने निरंकारी सेवादल व अन्य श्रद्धाळु भक्तांनी भाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *