टिटवाळा : मांडा पूर्व परिसरातील विनायक पार्क ते चार्म सिटी या महत्त्वाच्या मार्गावर अखेर पथदिव्यांची व्यवस्था करण्यात आल्याने संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अंधाराच्या छायेत असलेल्या या मार्गावर आता प्रकाशाची सोय झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, नगरसेविका उपेक्षा शक्तींवान भोईर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे.
विनायक पार्क ते चार्म सिटी हा रस्ता मांडा पूर्व व पश्चिम भागांना जोडणारा प्रमुख दुवा असल्याने या मार्गावर नेहमीच मोठ्या प्रमाणात रहदारी असते. मात्र, या रस्त्यावर पथदिव्यांची सुविधा नसल्याने नागरिकांना विशेषतः महिलांना रात्रीच्या वेळी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. अंधारामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता आणि परिसरात भीतीचे वातावरण होते.
या समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी व महिलांनी वारंवार मागणी करत नगरसेविका उपेक्षा भोईर यांच्याकडे पथदिव्यांची व्यवस्था करण्याची विनंती केली होती. या मागणीची दखल घेत नगरसेविका भोईर यांनी महापालिका प्रशासनाकडे तब्बल दोन वर्षे सातत्याने पाठपुरावा करत अखेर या कामास मंजुरी मिळवून दिली. त्यांच्या या चिकाटीमुळेच आज हा महत्त्वाचा मार्ग पथदिव्यांच्या प्रकाशाने उजळला आहे.
पथदिव्यांच्या उद्घाटनानंतर विनायक पार्क आणि चार्म सिटी परिसरातील नागरिकांनी नगरसेविका उपेक्षा भोईर यांचे मनापासून स्वागत करत कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी स्थानिक रहिवाशांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.
उद्घाटन प्रसंगी नगरसेविका उपेक्षा शक्तींवान भोईर, नगरसेवक संतोष तरे, भाजपचे मांडा-टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तीवान भोईर, युवा मोर्चा अध्यक्ष गिरीश भोईर, दीपक कांबळे, स्वप्निल पाठारे, उत्तर भारतीय आघाडी अध्यक्ष ब्रिजेश पांडे, अशोक पाटील, गणेश भोईर, सदगुरू मढवी, राम भोईर, शाम कुमार गिरजी, किरण पाटील, केतन कानाडे, दीपेश तरे यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.














Leave a Reply