खडवलीत नदीकाठी अज्ञात तरुणाचा खून; दगडाने ठेचून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज, ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे आवाहन
टिटवाळा , वार्ताहर : कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत खडवली गावाजवळील नदीकाठी एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी सापडलेल्या या मृतदेहावरून हा खून असल्याचा संशय व्यक्त केला जात असून दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मृत व्यक्तीचे वय अंदाजे 25 ते 30 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनेची माहिती मिळताच कल्याण तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे. परिसरातील नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, हा खून नेमका कोणी आणि का केला याचा तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, मृत व्यक्तीची ओळख पटत नसल्यामुळे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जर कोणाकडे या व्यक्तीबाबत काही माहिती असेल किंवा कोणी व्यक्ती हरवलेली असेल, तर त्यांनी तात्काळ कल्याण तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच आरोपींना गजाआड करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.














Leave a Reply