टिटवाळा पूर्वेत अखेर अतिक्रमणावर हातोडा; धोकादायक डीपी परिसरातून भाजी स्टॉल हटवले, रस्ता मोकळा

टिटवाळा (प्रतिनिधी) : टिटवाळा पूर्वेतील फाटक परिसरात निर्माण झालेल्या गंभीर व जीवघेण्या परिस्थितीवर अखेर प्रशासनाने कठोर पाऊल उचलत अनधिकृत भाजी स्टॉलवर मोठी कारवाई केली. नागरिकांच्या वारंवार तक्रारी आणि प्रसारमाध्यमांतून प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर आज प्रशासनाने बुलडोझरच्या सहाय्याने अतिक्रमण साफ करून रस्ता पूर्णपणे मोकळा केला.

फाटक परिसरात भाजी विक्रेत्यांनी रस्त्याचा मोठा भाग व्यापल्याने दररोज वाहतुकीचा खोळंबा होत होता. रिक्षा, दुचाकी आणि चारचाकी वाहनांना मार्ग काढताना मोठा त्रास सहन करावा लागत होता. पादचाऱ्यांनाही अरुंद जागेतून जीव धोक्यात घालून चालावे लागत होते. या सर्व गोंधळात सर्वात धोकादायक बाब म्हणजे याच ठिकाणी उभा असलेला उच्च दाबाचा वीज डीपी होता.

परिसरात शाळा असल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. शाळा सुटण्याच्या वेळेस येथे अक्षरशः गर्दीचा स्फोट होत होता. अशा परिस्थितीत कोणताही विद्युत अपघात झाला असता, तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली होती.

या पार्श्वभूमीवर आज सकाळी प्रशासनाच्या पथकाने अचानक धडक कारवाई करत सर्व अनधिकृत स्टॉल हटवले. बुलडोझरने अतिक्रमणावर चाल करून संपूर्ण रस्ता मोकळा करण्यात आला. कारवाईदरम्यान काही फेरीवाल्यांमध्ये किरकोळ गोंधळ झाला, मात्र पोलिस बंदोबस्तामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली.

कारवाईनंतर परिसरातील वाहतूक सुरळीत झाली असून नागरिकांनी मोठा दिलासा व्यक्त केला आहे. अनेकांनी “ही कारवाई कायमस्वरूपी राहिली पाहिजे” अशी मागणी करत प्रशासनाचे कौतुक केले आहे.

तथापि, पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी नियमित देखरेख आणि कडक अंमलबजावणी आवश्यक असल्याचेही नागरिकांनी स्पष्ट केले. टिटवाळा पूर्वेतील हा प्रश्न केवळ एक दिवसाची कारवाई करून संपणारा नसून, त्यावर सातत्याने लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.