टिटवाळा (वार्ताहर) : टिटवाळा परिसरात मराठी भाषेच्या सन्मानावर घाला घालणारी घटना उघडकीस आल्यानंतर वातावरण तापले आहे. Zeno Medical या औषध विक्री केंद्रातील कर्मचाऱ्याने ग्राहकासोबत मराठीत संवाद साधण्यास नकार दिल्याची माहिती समोर येताच स्थानिकांमध्ये संतापाची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.
महाराष्ट्रात व्यवसाय करत असताना राज्याच्या अधिकृत भाषेकडे दुर्लक्ष करणे ही गंभीर बाब मानली जात असून, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधित आस्थापनाला ७ दिवसांचा स्पष्ट अल्टिमेटम देत मराठीचा वापर अनिवार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अन्यथा कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
महाराष्ट्र अधिकृत भाषा अधिनियम, 1964 नुसार नागरिकांना सेवा देणाऱ्या सर्व आस्थापनांनी व्यवहारात मराठीचा वापर करणे बंधनकारक आहे. या कायद्याचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कारवाई होऊ शकते, याची आठवणही मनसेने करून दिली आहे. यामुळे या प्रकरणाला कायदेशीर स्वरूपही प्राप्त झाले आहे.
मनसेच्या वतीने देण्यात आलेल्या नोटीसमध्ये व्यवस्थापनाला तातडीने सर्व कर्मचाऱ्यांना मराठीत संवाद साधण्याचे निर्देश देण्यास सांगितले आहे. ठरलेल्या मुदतीत बदल न झाल्यास पोलिसांत तक्रार दाखल करून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
या प्रकरणात ॲड. अविनाश पांडुरंग शिळकंदे, दिलीप पुनमचंद राठोड, ॲड. महेश गायकवाड आणि रोहित जोशी यांनी एकमुखाने मराठी भाषेचा सन्मान राखण्याची भूमिका घेत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे टिटवाळ्यात नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून “मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही” असा ठाम संदेश दिला जात आहे. स्थानिक पातळीवर मराठीच्या सन्मानासाठी पुन्हा एकदा आवाज बुलंद होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.













Leave a Reply