कल्याण, वार्ताहर : राज्यभर गाजत असलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीतील बेफिकीरी आणि बेकायदेशीर एजंटगिरीचे गंभीर वास्तव समोर आणणारी धक्कादायक घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. केवायसी करून देण्याच्या बहाण्याने एका खाजगी एजंटने महिलेचा मोबाईल ताब्यात घेऊन तिच्याच नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार केले आणि त्यावरून नागरिकांना अश्लील मेसेज व व्हिडिओ पाठवत तिची बदनामी केल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे.
मोहने परिसरातील ही घटना केवळ एका महिलेची फसवणूक नसून, संपूर्ण योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उभे करणारी ठरत आहे. संबंधित महिलेला ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे मिळत नव्हते. चौकशीअंती केवायसी अपूर्ण असल्याचे समजल्यावर परिसरातील लोकांच्या सांगण्यावरून तिने केवायसी करून देणारा एजंट म्हणून ओळख असलेल्या रूतिक खंडारे याच्याशी संपर्क साधला.
खंडारे याने केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रांसह एक हजार रुपये घेतले आणि ओटीपी प्रक्रियेसाठी महिलेचा मोबाईल काही काळ स्वतःकडे ठेवून घेतला. मात्र, दिवस उलटूनही केवायसी पूर्ण झाली नाही आणि महिलेच्या खात्यात पैसेही जमा झाले नाहीत. याचदरम्यान एका व्यक्तीने थेट महिलेपाशी येऊन तिच्या नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून अश्लील मेसेज व व्हिडिओ पाठवल्याची तक्रार केली. ही बाब ऐकून महिला पूर्णपणे हादरली, कारण तिला इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडियाची माहितीही नव्हती.
यानंतर महिलेच्या मुलीने तपास केला असता धक्कादायक वास्तव उघड झाले. केवायसीच्या नावाखाली मोबाईल घेतलेल्या रूतिक खंडारे यानेच महिलेच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करून त्यावरून अश्लील संदेश आणि व्हिडिओ पाठवले होते. या प्रकारामुळे संबंधित महिलेची सामाजिक प्रतिमा मलिन झाली असून मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे.
या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी रूतिक खंडारे याला नोटीस बजावून सोडले आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे ‘लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीत सुरु असलेल्या अनधिकृत एजंटगिरीचा काळा चेहरा समोर आला आहे. नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडे कागदपत्रे किंवा मोबाईल देताना अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.















Leave a Reply